बंद घर दिसले की कडीकोयंडा तोडून चोरी करणाऱ्या आणि बेळगाव पोलिसांना डोकेदुखी ठरलेल्या उत्तरप्रदेशमधील चौकडीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.
बेळगाव शहराचा विस्तार झपाट्याने होतो आहे. जसा विस्तार वाढतो आहे, तसे उदरनिर्वाहानिमित्त बेळगावला परप्रांतीयांची भाऊगर्दीही वाढते आहे. वेगवेगळ्या कामानिमित्त बेळगावात येऊन वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीयांपैकी काही जण गुन्हेगारी कारवाया करण्यात गुंतले आहेत. बेळगाव पोलिसांना डोकेदुखी ठरलेल्या अशाच एका उत्तरप्रदेशमधील चौकडीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. दुचाकीवरून फिरून उपनगरातील बंद घरांची पाहणी करायची. एखादे बंद घर दिसले की कडीकोयंडा तोडून चोरी करायची, असा त्यांचा उद्योग. इतर वेळेला कोण प्लंबरचे काम करतो तर आणखी कोणी केस कापण्याचे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
एपीएमसीचे पोलीस निरीक्षक रमेश आवजी, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार, हवालदार व्ही. डी. बाबानगर, केंपण्णा दोडमनी, गोविंद पुजारी, दीपक सागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी संगमेश्वरनगर परिसरात संशयावरून चौघा जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडकीस आली आहे. नपासत अन्सारी (वय 42), फुरकान अन्सारी (वय 27), असीफ खान (वय 42), मोहसिन खान (वय 26) चौघेही राहणार बिजनौर, उत्तरप्रदेश अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता 20 सप्टेंबर 2022 रोजी संगमेश्वरनगर येथे एका बंद घराचा कडीकोंयडा तोडून 17 तोळे सोन्याचे दागिने व 2 लाख 20 हजार रुपये पळविल्याची कबुली दिली आहे.
संगमेश्वरनगर परिसरात दोघे जण दुचाकीवर बसले होते. तर दोघे जण खाली उभे होते. गस्तीवरील पोलिसांना पाहून त्यांनी पलायनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्यांची कसून चौकशी केली असता यापैकी दोघे जण आझमनगर परिसरातील एका हेअर कटिंग सलूनमध्ये काम करीत होते. तर अन्य दोघे जण प्लंबिंगचे काम करीत होते, अशी माहिती उजेडात आली आहे. या चौकडीने सध्या एका गुन्ह्याची कबुली दिली असून बेळगाव येथे चोरलेल्या ऐवजाची नवी दिल्ली विक्री केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. येत्या आठवडाभरात त्यांना पोलीस कोठडीत घेऊन बेळगाव पोलिसांचे एक पथक मुद्देमाल जप्त करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहे. नेहरुनगर परिसरात खोली करून वास्तव्य करणारा मोहसिन खान चोरीसाठी आलेल्या आपल्या सहकाऱ्यांना आश्रय देत होता, असे पोलीस तपासात उघडकीस आले असून गेल्या पंधरा वर्षांपासून दोघे जण बेळगावात राहतात. या टोळीतील गुन्हेगारांवर उत्तर प्रदेशमध्येही चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, दरोड्यासाठी खून आदी स्वरुपाचे गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे.
सलून चालकच सूत्रधार…
आझमनगर परिसरात सलून चालविणारा आसिफ खान उत्तरप्रदेशमधील गुन्हेगारांना बेळगावात बोलवायचा. हे सर्व जण दुचाकीवरून उपनगरात फेरफटका मारून बंद घरे हेरायचे. त्यानंतर संधी साधून चोरी करायचे. एपीएमसी पोलिसांनी या चौघा जणांच्या मुसक्या आवळल्या असून वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने बेळगावात वास्तव्य करून असलेल्या व गुन्हेगारीत सक्रिय झालेल्या परप्रांतीयांची कसून चौकशी करण्याची गरज या प्रकरणामुळे अधोरेखित झाली आहे.
Recent Comments