Savadatti

यल्लम्मा देवीचा उदकार अन भंडाऱ्याची उधळण, सौंदत्ती डोंगरावर भक्तांचा महापूर

Share

यल्लम्मा देवीचा उदकार अन भंडाऱ्याची उधळण करत सौंदत्ती डोंगरावर भक्तांचा महापूर येत आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने आज विक्रमी सुमारे 15 लाखांहून अधिक भाविकांनी रेणुका-यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली.

होय, भरत पौर्णिमा संपली तरी सौंदत्ती यल्लम्माच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या काही कमी झालेली नाही. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून भाविक महासागराप्रमाणे येत आहेत. आज रविवारी सुटीच्या दिवसामुळे यल्लम्मा मंदिरात भाविकांची गर्दी होती. विक्रमी सुमारे 15 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज आहे. रखरखत्या उन्हातही मोठ्या संख्येने भाविकांनी आदिशक्ती श्री रेणुका यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन धन्यता मानली. रेणुकेची विशेष पूजा करण्यात आली. महाशिवरात्रीपर्यंत येथे यात्रा भरणार असून, तोपर्यंत लाखो भाविक येतील अशी अपेक्षा आहे.

श्रीक्षेत्र यल्लम्मा डोंगर येथे शुक्रवारी पौर्णिमेच्या निमित्ताने मोठी जत्रा भरली होती. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि इतर राज्यातील लाखो भाविकांनी विशेषतः महिला भक्तांनी ‘उदे गं आई उदे’, ‘यक्कय्या जोगया’ असा उदकार करत यल्लम्मा देवीची पूजा केली.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर, गेल्या दोन वर्षांत डोंगरावर गर्दी झाली नव्हती. मंदिरात प्रवेशबंदी असल्याने भाविकांनी दुरूनच यल्लम्मा देवीला नमन केले होते. मात्र आता निर्बंध हटल्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणात ही जत्रा साजरी करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. याबाबत रेणुका-यल्लम्मा मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसय्या ईरय्या हिरेमठ यांनी ‘आपली मराठी’ला अधिक माहिती दिली.

एकीकडे भाविकांचा महापूर, तर दुसरीकडे भक्तीचा प्रवाह वाहत होता. बैलगाड्यातून लोकगीते गात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांसह शेतकरी देवीच्या डोंगरावर दाखल होताना दिसून आले. डोक्यावर घागरी घेऊन आलेल्या जोगतींचे नृत्य मंत्रमुग्ध करणारे होते. लोककला पथकांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मनोरंजन केले.

मलप्रभा नदीच्या काठावरील जोगुळ भावीत (विहिरीत) आणि यल्लम्मा मंदिराजवळील एन्नी होंडमध्ये भाविकांनी पवित्र स्नान केले. रस्त्याच्या कडेला आणि डोंगराच्या विस्तीर्ण वातावरणात खास नैवेद्य तयार करून देवीच्या परड्या भरून नैवैद्य अर्पण केला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही जत्रेत वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. यल्लम्मा डोंगर ते उगरगोळ मार्गावर तीन ते चार किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक समस्या नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न केले.

भंडाऱ्यांच्या उधळणीमुळे सर्व यल्लम्मा मंदिर परिसर पिवळाधमक झाला होता. मंदिरावर भंडारा उधळून भाविकांनी जल्लोष केला. उत्साही तरुणांची फौज भंडाऱ्याची उधळण करताना हरखून गेली.

Tags: