पंचरत्न यात्रेच्या माध्यमातून मी राज्यातील 65 मतदारसंघांचा दौरा केला आहे. सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेमुळे काँग्रेस अन भाजपला धडकी भरली आहे. ट्रिपल इंजिन सरकार असूनही कळसा, भांडुरी प्रकरणात प्रगती का नाही असा सवाल जेडीएसचे नेते व माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केला.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कक्केरी येथे पंचरत्न यात्रेसाठी आले असता, पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, पाण्याचा वापर करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. कर्नाटक, गोवा आणि केंद्रात भाजपचे ट्रिपल इंजिन सरकार असूनही कळसा, भांडुरी प्रकरणात प्रगती नाही. न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करण्यास इतका वेळ का लागला? 100 कोटी भरून कळसा, भांडुरी योजनेचे काम सुरू झाले नाही. पाणी वाटपात अन्याय होत आहे. दोन राज्यांत वाद आहेत, मग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्ती करून वाद का मिटवला नाही असा सवाल त्यांनी केला. तसेच काम महत्वाचे आहे, कामाचं प्रदर्शन नव्हे असा टोला त्यांनी हाणला.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केलेल्या सीडी प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपवावे या मागणीवर, बोलताना कुमारस्वामी म्हणाले, तंत्रज्ञानाच्या साह्याने बोगस सीडी करणारे काहीजण आहेत. सीडीवर चर्चा करून कोणाचाच फायदा होत नाही. सीबीआय चौकशीतून तरी काय निघणार आहे? राजकारण्यांनी लोकांच्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. कौटुंबिक राजकारणाचा विषय आता अप्रासंगिक आहे. प्रत्येकाला संविधानाच्या चौकटीत राहून आपला व्यवसाय निवडण्याचा अधिकार आहे असे ते म्हणाले.
कुमारस्वामी “यू टर्न” घेतात या भाजप नेते सी. टी. रवी यांच्या आरोपाला उत्तर देताना, अर्धवट लोकांवर काय बोलणार? डबा खाली असेल तर आवाज येत नाही, भरलेला असेल तरी आवाज येत नाही, पण अर्धवट भरलेला असेल तर आवाज येतो. भाजपचा गैरकारभार मीच पूर्णतः जनतेसमोर आणला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
जेडीएसच्या पंचरत्न यात्रेमुळे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना धडकी भरली आहे. आमच्या यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जेडीएसला फार तर 10-12 जागा मिळतील असे त्यांनी गृहीत धरले होते. पण आता त्यांची पाचावर धारण बसली आहे. हासनमध्ये उमेदवारीबाबत कोणताही संभ्रम नाही, सर्वजण बसून वाटाघाटी करतील. अर्सिकेरे येथील एका विशाल मेळाव्यात 40,000 लोकांनी उपस्थिती लावली. नंतर शिमोगा, चामराजनगरसह अनेक ठिकाणी पक्षाचे मेळावे यशस्वी झाले आहेत असे त्यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर, कुडची, रायबाग, बैलहोंगल तालुक्यात पंचरत्न यात्रा आजपासून सुरु केली आहे. खानापूर तालुक्यातील 30-40 गावांना भेटी देणार आहे. मी 123 धावांचे लक्ष्य घेऊन बाहेर पडलो. जेडीएसला संपूर्ण पाच वर्षांसाठी संपूर्ण बहुमत द्या, तुमच्या सर्व समस्या मी सोडवितो अशी मी जनतेला प्रार्थना करतो असे कुमारस्वामी म्हणाले.
यावेळी जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments