Belagavi

15 वर्षांहून अधिक जुनी वाहने स्क्रॅप करू नये यासाठी बेळगावात आंदोलन

Share

केंद्र सरकारने 15 वर्षांहून अधिक काळ वापरलेली वाहने भंगारात काढण्याचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी उत्तर कर्नाटक मॅक्सिकॅब मालक संघटनेच्या वतीने बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने देशातील 15 वर्षांहून अधिक काळ वापरलेली वाहने भंगारात काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे मॅक्सिकॅब व्यवसायावर संकट कोसळले आहे. ग्रामीण भागात प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात टेम्पो व अन्य खासगी वाहनांची भूमिका मोठी आहे. या व्यवसायात मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागतो. या व्यवसायावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सुमारे 1 लाख लोक अवलंबून आहेत. वाहने भंगारात काढण्याचा निर्णय अमलात आल्यास, हे सर्व लोक व त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी मॅक्सिकॅब-टेम्पो मालक-चालक संघटनेच्या वतीनं बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणा देऊन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर कर्नाटक मॅक्सिकॅब मालक संघटनेचे अध्यक्ष चन्नबसप्पा राचन्नावर म्हणाले, 15 वर्षांहून अधिक काळ वापरलेली वाहने सरसकट स्क्रॅप करण्याचा निर्णय या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांवर अन्याय करणारा आहे. नव्या वाहतूक नियमानुसार नवीन टेम्पो घेऊन व्यवसाय करणे आम्हाला परवडणारे नाही. कारण नवीन टेम्पो घ्यायचा झाल्यास किमान 25 लाख रुपये लागतील. त्यातील निम्मी म्हणजे 12.5 लाख रुपये सरकार भरण्यास तयार असेल तर आम्हाला टेम्पो घेऊन व्यवसाय करता येईल. परंतु सरकारकडून ही रक्कम भरली जाणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने सरसकट वाहने स्क्रॅप न करता, जी वाहने सुव्यवस्थित आहेत त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि राज्याचे परिवहन मंत्री बी. श्रीरामुलू यांनी यात जातीने लक्ष घालून आमची समस्या सोडवावी अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी मॅक्सिकॅब मालक-चालक संघटनेचे हनुमंत चलवादी, मारुती हाळहरली, इमामसाब जगळूर, मोशीन निंबूवाले, एस. के. दिंडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
एकंदर 15 वर्षांहून अधिक काळ वापरलेली वाहने सरसकट स्क्रॅप करण्याचा निर्णय रद्द करून चांगल्या कंडिशनमध्ये असलेल्या वाहनांना प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करण्याची मुभा देण्याची मागणी उत्तर कर्नाटक मॅक्सिकॅब-टेम्पो मालक संघटनेने केली आहे. यावर सरकार काय निर्णय घेते हे पहावे लागेल.

Tags: