Belagavi

बेळगावात ब्राह्मण समाजाची निदर्शने; कुमारस्वामी, सिद्धरामय्या यांच्या प्रतिकृतींचे दहन

Share

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, सिद्धरामय्या यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बेळगावात ब्राह्मण समाजाने निदर्शने केली. या दोन्ही नेत्यांच्या प्रतिकृती दहन करून निषेध करण्यात आला.

बेळगावातील टिळकवाडीतील आरपीडी क्रॉसमध्ये बेळगाव जिल्हा अखिल ब्राह्मण समाजातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. भाजप नेते आर.एस. मुतालिक आणि नगरसेविका वाणी जोशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ब्राह्मण समाजाबाबत कुमारस्वामी आणि सिद्धरामय्या यांनी अवमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ फुली मारलेली त्यांची छायाचित्रे निदर्शकांनी हाती धरली होती. त्याचप्रमाणे सुमारस्वामी आणि सिद्धरामुल्ला अशी नावे लिहिलेले फलक हाती घेऊन घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर रस्त्यावर दोन्ही नेत्यांच्या प्रतिकृती दहन करून निषेध करण्यात आला.

यावेळी बोलताना नगरसेविका वाणी जोशी यांनी, कुमारस्वामींनी राजकीय टीका जरूर करावी, परंतु वैयक्तिक आणि ब्राह्मण समाजाविरोधात अवमानास्पद वक्तव्य करू नये अशी मागणी केली. कोणीही ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये यासाठी हे आंदोलन छेडल्याचे सांगून कुमारस्वामीं या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी केली.

यावेळी बोलताना ब्राह्मण महासभेचे आर. एस. मुतालिक यांनी, कुमारस्वामी, सिद्दरामय्या यांनी ब्राह्मण समाजाची विनाविलंब, विनाअट माफी मागावी अशी मागणी केली. प्रल्हाद जोशीना मुख्यमंत्री करायचा घाट रा. स्व. संघ आणि भाजप घालत आहे, जोशी खरे ब्राह्मण नाहीत असे म्हणत कुमारस्वामींनी समस्त ब्राह्मण समाजाचा अवमान केला आहे. दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना तातडीने माफी मागावी. आधी रामकृष्ण हेगडे, एस. गुंडूराव हे ब्राह्मण मुख्यमंत्री झाले आहेत. पण आता प्रल्हाद जोशी मुख्यमंत्री होणार म्हणून का विरोध केला जातोय असा सवाल त्यांनी केला.

एकंदर, राजकीय टीका होऊ करा, पण वैयक्तिक आणि ब्राह्मण समाजावर टीका खपवून घेतली जाणार नाही असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला.

Tags: