निवडणुकीत स्पर्धा, चुरस असेल तर मजा येते. आमच्या विरोधकांनी आव्हान दिल्यामुळे आमचे समर्थक पेटून उठले आहेत. विरोधकांचे आव्हान मी खिलाडूवृत्तीने घेतले आहे असे बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
बेळगाव तालुक्यातील तारिहाळ गावात काँग्रेसचा मेळावा पार पडला. या दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, निवडणूक एकतर्फी होऊ नये या मताची मी आहे. आतापर्यंत आमचे समर्थक, कार्यकर्ते, अक्का निवडून येणार म्हणून निवांत होते. पण विरोधकांनी आव्हान दिल्याने ते पेटून उठले आहेत. जेव्हा-जेव्हा आव्हाने आली तेव्हा-तेव्हा आमच्या कार्यकर्त्यानी मेळावे, संमेलन आयोजित केले. माझ्या विजयासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करतील यात शंका नाही. पण भाजपच्या गोटात उमेदवार कोण याबाबत संभ्रम आहे असे सांगत हेब्बाळकर यांनी विरोधकांना टोला लगावला.
‘हेब्बाळकर यांनी निवडणुकीनंतर एमए आणि पीएचडी मिळवली आहे’, या सतीश जारकीहोळी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सतीश जारकीहोळी आमचे नेते आहेत. त्यांनी मला प्रोत्साहन दिले आहे. त्यांचे शब्द खोटे ठरू नयेत अशी प्रार्थना मी देवाला करते असे त्या म्हणाल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस पक्ष चिन्हात बदल सुचविल्याच्या मुद्द्यावर, हे माझ्या लक्षात आले नाही. आमचे अध्यक्ष हे ईश्वरभक्त आहेत. अध्यक्ष नेहमी सांगतात की 136 जागा येतील. त्यांना मी एकदा विचारले की तुम्ही हे इतक्या आत्मविश्वासाने कसे सांगता? त्यावर त्यांनी ही दैवी शक्ती असल्याचे सांगितले. येत्या निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचं सत्तेत येईल हे कोणताही ज्योतिषी सांगू शकेल असे मला वाटते असे आ. हेब्बाळकर यांनी सांगितले.
एकंदर, निवडणुकीत स्पर्धा असावी, तरच मजा येते असे सांगत आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे.


Recent Comments