Belagavi

विकासासाठी सर्वाना सोबत घेऊन जाण्याची भाजपची भूमिका : आ. अभय पाटील, जिरली यांचे स्पष्टीकरण

Share

विकासासाठी सर्वाना सोबत घेऊन जाण्याची भाजपची भूमिका आहे. त्यानुसारच महापौर-उपमहापौर निवड करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया आ. अभय पाटील आणि भाजपचे प्रवक्ता एम. बी. जिरली यांनी दिली.

बेळगावात आज महापौर-उपमहापौर निवडणूक पार पडल्यानंतर काही कन्नड पत्रकारांनी महापौर-उपमहापौरपदी पुन्हा मराठी भाषिक नगरसेवकांची निवड का केली असा प्रश्न केला असता त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

आ. अभय पाटील म्हणाले, इतकी वर्षे बेळगावात भाषेच्या आधारावर महापालिकेचे राजकारण चालत होते. त्यामुळे कोणीही आयाराम-गयाराम महापौर-उपमहापौर होत. राज्याच्या आणि बेळगावच्या हिताच्या दृष्टीने प्रथमच पक्षचिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याला अनेकांनी विरोध केला. मात्र नंतर तेसुद्धा पक्ष चिन्हावर लढले. त्यात भाजपने बहुमत मिळवले आहे. बेळगावच्या विकासासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही निर्णय घेऊन महापौर-उपमहापौर केले आहेत. सर्वाना सोबत घेऊन जाण्याचे सामर्थ्य भारतीय जनता पक्षात आहे. स्वच्छ, पारदर्शी प्रशासन देणे हे आमचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी सांगितले.

भाजपने महापालिकेत बहुमत मिळवूनदेखील कन्नड महापौर न करता मराठी महापौर का केला असा सवाल करणे कन्नडधार्जिण्या पत्रकारांनी विचारणे सुरूच ठेवले. त्यावर बोलताना भाजप राज्य प्रवक्ता ऍड. एम. बी. जिरली म्हणाले, राष्ट्रवाद आणि विकास हा भाजपचा अजेंडा आहे. त्यासाठी सर्वभाषिकांना सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. बेळगावात कन्नड खासदार आहेत. आमचे दोन आमदार आहेत. मराठी महापौर-उपमहापौर केले आहेत. पण सत्ताधारी गटनेता कन्नड भाषिक नगरसेवक राजशेखर डोनी यांना केले आहे. त्यामुळे केवळ हे भाषिक, ते भाषिक असे म्हणण्यापेक्षा विकासाच्या बाजूने उभे रहायला हवे. भाषेच्या मुद्द्यामुळे बेळगावचा विकास झाला नव्हता. आता विकासाला प्राधान्य द्यायला हवे. भाजप कन्नड भूमी, भाषेच्या प्रति वचनबद्ध आहेच, त्या विचारानेच पुढे जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

एकंदर, बेळगावच्या महापौर-उपमहापौरपदी मराठी भाषिक नगरसेवकांची निवड झाल्याने कन्नड संघटनांहून जास्त कन्नड पत्रकारांनाच पोटशूळ उठल्याचे यावेळी दिसून आले. परंतु आ. अभय पाटील आणि भाजप प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी त्यावर योग्य उत्तर देऊन त्यांची बोलती बंद केल्याचे दिसून आले.

Tags:

#BJP abhaypatil mbjirli