Belagavi

मुतगेजवळ रिंग रोडच्या विरोधात रास्ता रोको सुरु

Share

बेळगाव तालुक्यातील सुमारे ३४ गावातील सुपीक शेतजमीन संपादित करून रिंग रोड करण्याचं घाट घालण्यात आला आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती, श्रीराम सेना, राज्य रयत संघटना आदींच्या सहभागाने मुतगे गावाजवळ रास्ता रोको सुरु करण्यात आलाय.

आंदोलन शेतकऱ्यांनी मुतगे गावाजवळ बाची-रायचूर राज्य महामार्ग अडवून रास्ता रोको सुरु केलाय. रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडून वाहतूक रोखण्यात आलीय. यात मुतगा व परिसरातील अनेक गावातील शेतकरी, महिला, शाळकरी मुले-मुली आणि सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर, पुंडलिक पावशे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. जिल्हा प्रशासनाकडून निदर्शनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Tags: