Belagavi

विजय मोरे व त्यांचा मुलगा धावले जखमीच्या मदतीसाठी

Share

जिथे मदतीची गरज असते तिथे देव स्वतः धावतो किंवा किमान त्याचे दूत पाठवतो हे काही खोटे नाही. आज विजय मोरे आणि त्यांचा मुलगा ऍलन मोरे यांनी ते सिद्ध केले. महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी त्यांनी आपला प्रवास थांबवला, त्यांनी तातडीने प्राथमिक उपचार मिळवून दिले.

पुणे बंगळुरू महामार्गावर सहा लेनचे काम सुरू असल्याने एका लेनवर संकेश्वरजवळ गर्दी वाढली आहे. अवजड वाहतूक ठप्प झाली होती. दुपारी बाराच्या सुमारास एक मोटारसायकलस्वार गर्दीतून निघून गेला. त्याला समोरील ट्रकचा अंदाज आला नाही. त्याने ब्रेक लावला पण मोटारसायकल थेट ट्रकच्या मागच्या टायरमध्ये घूसली. संपूर्ण मोटरसायकलचा चक्काचूर झाला. अखेर काही लोकांनी त्याला ट्रकखालून बाहेर काढले.

देवाच्या कृपेने तो वाचला, परंतु त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या. तत्काळ मदतीची गरज होती. त्याच सुमारास विजय मोरे यांची गाडी गर्दीतून मार्गक्रमण करत घटनास्थळी पोहोचली. मुलगा ऍलन मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष ममदापूर यांच्यासह ते कोल्हापुरात सावली केअर सेंटरचा हॅपी स्ट्रीट कार्यक्रम आटोपून ते परत येत होते. अपघात व जखमी रस्त्यावर पडलेले पाहून त्यांनी तत्काळ गाडीतून उतरून धाव घेतली. जखमी व्यक्तीला धीर दिल्यानंतर तातडीने ऍम्ब्युलन्स बोलावण्यात आली आणि त्याला तत्काळ उपचार देण्यात आले.

यावेळी तेथे दाखल झालेल्या पोलिसांनी विजय मोरे यांचेही आभार मानले आणि ऍलन मोरे विजय मोरे हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा ऍलन मोरेही या कामात पुढे येत आहे. जखमीला तत्काळ मदत मिळाल्याने महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूकही सुरळीत झाली. त्याबद्दल अनेक वाहनधारकांनी या दोघांचेही आभार मानले.

Tags: