Belagavi

शिवसृष्टीचे काम पूर्णत्वाकडे; लवकरच उदघाटन : आ. अभय पाटील

Share

बेळगावातील नियोजित शिवसृष्टीचे काम पूर्णत्वाकडे आले असून, उदघाटन लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी दिली.

बेळगावात ‘आपली मराठी’सोबत बोलताना आ. अभय पाटील म्हणाले, हिंदवी स्वराज्य संस्थापक छ्त्रपती श्री शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनावर आधारित शिल्पाधारित शिवसृष्टी उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच ते पूर्ण करून शिवजयंतीला येत्या १९ फेब्रुवारी किंवा २६ फेब्रुवारीला या शिवसृष्टीचे उदघाटन करण्यात येणार आहे. उद्या होणार असलेल्या बुडाच्या बैठकीत उदघाटनाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. माझा आमदार निधी आणि बुडाच्या निधी अशा संयुक्त निधीतून हा प्रकल्प १० कोटी रुपये खर्चून साकारला आहे असे आ. पाटील यांनी सांगितले.

आ. अभय पाटील पुढे म्हणाले, नियोजित शिवसृष्टीत लाईट अँड साउंड सिस्टीमवर आधारित मराठी आणि कन्नड भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनगाथेची माहिती शिवभक्तांना देण्यात येणार आहे. दररोज सायंकाळी ६.३० च्या नंतर हा शो सुरु होईल. ब्लु टूथच्या माध्यमातून शिवचरित्राची माहिती ऐकण्यासाठी शिवभक्तांसाठी १५० हेडफोन्स उललब्ध करण्यात येणार आहेत. त्याशिवाय प्रथमच येथे वॉटर थीम आधारित म्हणजेच पाण्याच्या कारंजावर शिवचरित्रातील प्रसंग साकारून माहिती देण्यात येणार आहे. त्याचा ट्रायल सुरु आहे. शिवसृष्टीतील रंगरंगोटी व काही किरकोळ कामे प्रलंबित असून ती लवकरात लवकर पूर्ण करून शिवसृष्टीचे उदघाटन शक्य तितक्या लवकर करण्याचे नियोजन असल्याचे आ. अभय पाटील यांनी सांगितले.

एकंदर, आ. अभय पाटील यांच्या संकल्पनेतून बेळगावात साकारत असलेल्या शिवसृष्टीचे लवकरच उदघाटन होणार आहे, आणि ही बहुप्रतीक्षित शिवसृष्टी पाहण्यासाठी शिवभक्तांना लवकरच खुली होणार ही समाधानाची बाब आहे.

Tags: