बेळगावात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बापट गल्ली कार पार्किंग परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने गेल्या तीन दिवसांत एकूण 19 जणांना जखमी केले आहे.
बेळगावातील बापट गल्ली कार पार्किंग परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने चांगलाच उच्छाद मांडला आहे. गेल्या तीन दिवसांत एकूण 19 जणांना चावे घेऊन जखमी केले आहे. स्थानिक रहिवाशांनी याबाबत महानगर पालिकेकडे तक्रार करून कुत्र्याच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे.
त्यावर महापालिकेने कुत्री पकडणाऱ्यांना पाठवून दिले. मात्र हे लोक बाहेरगावचे असल्याने त्यांना शहराची नीट माहिती नसल्याने कुत्रे पकडण्यात अपयश आल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. बापट गल्ली, कार पार्किंग परिसर, खडेबाजार, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, किर्लोस्कर रोड यासह बाजार परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दररोज हजारो लोक आपल्या दैनंदिन व्यवसायासाठी बाजारपेठेत येतात आणि लहान मुलांनाही सोबत घेऊन येतात. अशा वेळी कुत्र्याने हल्ला केला तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल मल्लिकार्जुन यांनी केला.
या परिसरात एका भटक्या कुत्र्याने सुमारे 19 जणांचा चावा घेतला आहे. याआधीही शहरातील रस्त्यांवर अनेकांवर त्याने हल्ला केला आहे. त्याचा आम्ही व्हिडीओ बनवून महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे असे विजय बोजगार यांनी सांगितले.
बापट गल्ली परिसरात लोकांचे चावे घेणाऱ्या कुत्र्याला पकडण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांसमवेत विजय बोजगार, नारू निलजकर, अवधूत तुडवेकर, अतिश धाटोंबे, सचिन चौगुले आणि श्रीराम सेने हिंदुस्थान कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.
एकंदर, शहराच्या मध्यवर्ती भागात उच्छाद मांडलेल्या त्या भटक्या कुत्र्याला पकडण्यास पालिका कर्मचाऱ्यांना अपयश आले असल्याने बेळगाववासियांनी मनपा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.


Recent Comments