दुसऱ्याच्या घरासमोर उभे राहून फोटो काढून गृहनिर्माण प्रकल्पाच्या घराचे पैसे लुटल्याची घटना 2010-11 मध्ये चिक्कोडी तालुक्यातील वाळकी ग्रामपंचायतीत घडली होती.

या घटनेची चौकशी व्हावी, यासाठी गेल्या ५ वर्षांपासून ग्रामस्थ आग्रही आहेत. तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तालुका पंचायत सहायक संचालक एस. एस. मठद यांनी वाळकी गावाला भेट देऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य तो अहवाल पाठवण्याचे आश्वासन दिले. मठद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2010-11 या आर्थिक वर्षात गृहनिर्माण योजनेत प्रिया प्रकाश पाटील यांनी बनापा तुकाराम टाकळे यांच्या घरासमोर फोटो काढून चार टप्प्यात शासकीय घरकुल योजनेचे 75 हजार रुपये घेतले अशी तक्रार ग्रामस्थांनी केली होती.

तत्कालीन ग्रामपंचायत अध्यक्ष के. जी. पाटील व ग्रामविकास अधिकाऱ्यांसह तालुका पंचायत राज विभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी टाकळे यांच्या घरासमोर पाटील यांचा फोटो काढून जीपीएस केला, अशी तक्रार ग्रामस्थांनी लोकायुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे केली होती. तक्रार करूनही अधिकारी चौकशी करत नसून या घोटाळ्यात अधिकाऱ्यांचा हात आहे अशी तक्रार केली होती. याचप्रकारे गावातील तीन-चार घरांच्या बाबतीतही गैरव्यवहार झाला असून तक्रार देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगत बिरू मधाळे यांनी चौकशीची मागणी केली आहे.
यावेळी गावचे अध्यक्ष राहुल ढोणे, खंडेराव पाटील, सुजय पाटील, अण्णासाहेब नायक, महादेव पाटील, सुकुमार गोमाई, मारुती पाटील, रमेश ढोणे, परसू नायक, आप्पासाहेब लाटकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments