श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर एका आमदारांच्या दबावामुळे पोलिसांनी दडपशाही सुरु केल्याचा आरोप करून बेळगाव दक्षिण मतदारसंघातून यावेळी निवडणूक लढविण्याचा मनोदय श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुसकर यांनी व्यक्त केलाय.
टिळकवाडी आणि शहापूर पोलिसांकडून श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर नाहक दडपशाही सुरु असून, अफू, गांजासारख्या प्रकरणात आरोपींना सोडून दिले जात आहे. यावर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन रमाकांत कोंडुसकर यांनी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांना दिले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, २८ जानेवारीला रात्री ११.३०च्या सुमारास टिळकवाडी पोलिसांनी अफू-गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना रंगेहाथ अटक केली होती. याचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे. मात्र सीपीआय दयानंद शेगुणसी व दोन पोलिसांनी आरोपींना टिळकवाडी पोलीस ठाण्यात आणून त्यांचे व जप्त केलेल्या गांजाचे फोटो काढले. परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता मोकाट सोडून दिले. यामागचे गौडबंगाल काय असा सवाल त्यांनी केला.

अनगोळ येथे श्रीराम सेनेतर्फे नुकताच महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. त्याला परवानगी देण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना टिळकवाडी पोलिसांनी एसीपी, पोलीस आयुक्त आणि मनपा कार्यालयात चकरा मारायला लावल्या. आम्ही मनपात चल भरून दिल्यानंतर तुम्हाला कोण, कसे परवानगी देते असे म्हणत त्रास दिला. दक्षिणमधील कुठल्याही ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा झाल्यास स्थानिक आमदारांचे परवानगी पत्र आणण्यास पोलीस सांगतात.
धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी पोलीस स्वतः सक्षम यंत्रणा असताना आमदारांच्या परवानगीची गरज काय असा सवाल कोंडुसकर यांनी केला. आमदारांच्या दबावाखाली पोलीस आपल्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून छळ करत आहेत. आज जे स्थानिक आमदार आहेत ते श्रीराम सेनेच्या पाठिंब्यामुळे निवडून आलेत हे त्यांनी विसरू नये असा टोला त्यांनी आ. अभय पाटील यांना त्यांचे नाव न घेता लगावला. यावेळची विधानसभा निवडणुकीत बेळगाव दक्षिण मतदार संघातून लढवणार असल्याचा मनोदय त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला. कोणत्या पक्ष किंवा संघटनेच्या झेंड्याखाली निवडणूक लढणार असा प्रश्न केला असता, अजून त्यावर विचार सुरु आहे. मात्र निवडणूक लढविणार असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी श्रीराम सेनेचे पदाधिकारी आणि वकील उपस्थित होते.


Recent Comments