Crime

बलात्कार प्रकरणी स्वयंघोषित संत आसाराम बापू दोषी; कोर्ट उद्या सुनावणार शिक्षा

Share

स्वयंघोषित संत आसाराम बापू याच्या अडचणीत वाढ झाली आहे. आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून उद्या आसाराम बापूला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

भारतात कधीकाळी आसाराम बापू हा मोठा अध्यात्मिक गुरू होता. आसारामच्या सत्संगमध्ये अनेक राजकीय मंडळींनीदेखील हजेरी लावली होती.

2013 मध्ये सूरतमधील एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूवर लावण्यात आला होता. तर, या पीडित तरुणीच्या बहिणीवर आसारामचा मुलगा साई नारायण याने बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसारामशिवाय, त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या आरोपी होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आसाराम बापूला कोर्टात व्हर्च्युअली हजर करण्यात आले. सुनावणीनंतर कोर्टाने आसारामला दोषी असल्याचे जाहीर केले. मात्र, शिक्षा उद्या, मंगळवारी सुनावणार असल्याचे जाहीर केले.

सूरत बलात्कार प्रकरणात आसाराम बापूच्या पत्नीसह इतर सहा आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, आसाराम बापूने 2001 ते 2006 दरम्यान पीडितेवर अनेकवेळा अत्याचार केला होता. ही पीडिता शहराबाहेरील एका आश्रमात वास्तव्यास होती.
आधीच तुरुंगात आहे आसाराम बापू

आधीच एका प्रकरणात आसाराम बापू हा बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सध्या जोधपूर येथील तुरुंगात आसाराम बापू शिक्षा भोगत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टात त्याने जामीन अर्ज दाखल केला होता. वाढते वय आणि ढासळती प्रकृती यामुळे जामीन मंजूर करण्याची विनंती आसारामने केली होती. मात्र, प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता कोर्टाने ही विनंती मान्य केली नाही. आधीच एका प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असताना आता दुसरीकडे आणखी एका प्रकरणात आसाराम दोषी आढळला आहे.
आसारामच्या मुलीच्या हाती आश्रमाचा कारभार

देशभरात आसारामचे 400 पेक्षा जास्त आश्रम आणि 40 शाळा आहेत. आता हे संपूर्ण नेटवर्क आसारामची मुलगी भारतीच्याच हाती आहे. आसारामच्या अटकेननंतर वडील आसाराम बापूच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मदतीने भारती आसाराम ट्रस्ट चालवत असल्याचे वृत्त होते. ‘संत श्री आसारामजी ट्रस्ट’ची धर्मादाय संस्था म्हणून नोंद आहे. याचं मुख्यालय अहमदाबादमध्ये आहे. इथेच आसारामने पहिल्या आश्रमाची स्थापना केली होती.

Tags: