बेळगाव नगरविकास प्राधिकरणात (बुडा) झालेल्या कथित दीडशे कोटी रुपयांच्या भूखंड लिलावाच्या घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी आम आदमी पक्षातर्फे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात आले.
बेळगाव नगरविकास प्राधिकरणाकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन मॅन्युअली असे दोनवेळा भूखंडांचा लिलाव करण्यात आला आहे. होळी रंगपंचमी सुटी असताना ऑफलाईन मॅन्युअल पद्धतीने लिलाव करून त्यात सरकारची फसवणूक करून दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे, यात काही लोकप्रतिनिधी आणि बुडा अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करून त्याची समग्र चौकशी करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. ती पूर्ण न झाल्याने आम आदी पक्षाचे नेते राजू टोपन्नावर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात आले.
या संदर्भात प्रसार माध्यमांना माहिती देताना राजू टोपन्नावर म्हणाले, बुडामधील दीडशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आम आदमी पक्षातर्फे नगरविकास खाते, पोलीस प्रशासन आणि लोकायुक्तांना केली होती. नगरविकास खात्याने जिल्हाधिकाऱ्यांना ७ दिवसांच्या आत चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी अजून अहवाल दिलेला नाही. लोकायुक्तांनी बुडाला म्हणणे मांडण्यास ४ मार्चपर्यंतचा अवधी दिला आहे.
एवढ्या गंभीर प्रकरणात ४ महिन्यांची दीर्घ मुदत दिल्याने बोगस कागदपत्रे, व्हिडिओग्राफी करून प्रक्रिया कायदेशीर भासवले जाण्याची शक्यता आहे. एकूणच या प्रकरणात सरकार आणि अधिकारी बुडामधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत असा आरोप त्यांनी केला. गेल्या २० वर्षांत बुडाने नवीन वसाहत निर्माण केली नाही. केवळ शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन संपादन केल्या आहेत. त्या जमिनी भूमाफियांनी देण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे बेळगावातील गोरगरीब जनतेला परवडेल अशा दरात भूखंड मिळत नाहीय. या एकूणच प्रकरणाची सर्वंकष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी हि आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही बेमुदत आंदोलन छेडले आहे असे टोपन्नावर यांनी सांगितले.
या आंदोलनात आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments