National

फेसबुकवरून जडलं प्रेम अन् स्वीडनच्या युवतीने थेट भारतात येऊन केले लग्न !

Share

प्रेमाचे धागेदोरे हे कसे जुळतील याचा अंदाज लावणं कठीण झालं आहे. आताच्या डिजिटल युगात तर प्रेमाच्या रंजक कहाण्या देशाच्या सीमापार पोहोचलेल्या दिसत आहेत. अशाचा एका प्रेमाची भन्नाट कहाणी व्हायरल झाली असून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण प्रेमाची नाती आता डिजिटल जमान्यातही वेगानं जुळली जात असल्याचं एका प्रेमकहाणीतून समोर आलं आहे. फेसबुकवरून एका महिलेचं तरुणासोबत प्रेम जडलं आणि स्वीडनहून ती महिला थेट भारतात पोहोचली. उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या पवन कुमारसोबत लग्नबंधनात अडकण्यासाठी स्वीडनची क्रिस्टन लिबर्ट थेट भारतात पोहोचली अन् त्यांची रंजक प्रेमकहाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली.

उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये राहणाऱ्या पवन कुमारशी क्रिस्टन लिबर्टची २०१२ ला फेसबुकवर मैत्री झाली. कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. स्वीडनहून लग्नासाठी आलेल्या क्रिस्टनला पाहून इटावाच्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यांची प्रेमकहाणी दहा वर्षांपासून सुरु झाली होती. पवन आणि क्रिस्टनचं खरं प्रेम पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पवन कुमारसोबत लग्न करण्यासाठी क्रिस्टन स्वीडहून विमान प्रवास करून भारतात पोहोचली. फेसबुकवर ओळख झालेल्या पवनसोबत लग्नगाठ बांधण्यासाठी क्रिस्टन उत्तर प्रदेशला आली आणि हिंदू संस्कृतीनुसार इटावाच्या एका शाळेत या प्रेमीयुगुलाने लग्न केलं.

फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर क्रिस्टन आणि पवन फोनवर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधायचे. २०१२ ला दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. त्यानंतर काही वर्षांनी त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दहा वर्षांची ही प्रेमकहाणी हृदयात घेऊन हे प्रेमीयुगुल आग्रा येथील ताजमहल पाहण्यासाठी गेले आणि प्रेमाचं प्रतिक असलेल्या ताजमहलाला पाहून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नवऱ्याचे वडील गितम सिंग यांनी म्हटलंय की, मुलांच्या सुखातच खरा आनंद आहे. कुटुंबातील आम्ही सर्वजण या लग्नासाठी सहमत आहोत. तर स्वीडनच्या क्रिस्टन लिबर्टने म्हटलं, “मी भारतात याआधीही आले आहे. मला भारत देश खूप आवडतो आणि मी हे लग्न करून खूप आनंदी आहे.”

Tags: