Belagavi

बुडा घोटाळ्याची चौकशी न केल्यास आंदोलन : राजू टोपन्नावर यांचा इशारा

Share

बेळगाव नगरविकास प्राधिकरणात झालेल्या 150 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याची चौकशी करून दोन दिवसांत त्याचा अहवाल जाहीर करावा, अन्यथा सोमवारपासून आम आदमी पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा पक्षाचे नेते राजू टोपन्नावर यांनी दिलाय.

बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना राजू टोपन्नावर म्हणाले, माहितीच्या अधिकारातून आम्ही बुडामधील भूखंड घोटाळ्याची माहिती विचारली होती. पण अधिकारी ती देण्यास टाळाटाळ, मुद्दामहून विलंब करत आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहोत. एकदा ऑनलाईन पद्धतीने भूखंड लिलाव केला त्यात जादा दराने प्लॉट विकण्यात आले. दुसर्यावेळी होळी पौर्णिमा सुटी असताना ऑफलाईन पद्धतीने लिलाव करून कमी दराने प्लॉट विकण्यात आले. यात दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या नातेवाईक, निकटवर्तीयांच्या नावाने प्लॉट घेतले आहेत.

सह्याद्रीनगरात सुमारे ५० लाख रुपये किंमतीचा प्लॉट एका अभियांत्रीच्या विद्यार्थ्याने विकत घेतला आहे. एक विध्यार्थी एवढा महागडा प्लॉट कसा काय विकत घेऊ शकतो? असा सवाल राजू टोपन्नावर यांनी केला. भूसंपादन करून जनतेला कमी दरात भूखंड मिळवून देण्याच्या हेतून नगरविकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र बुडाकडून या उद्देशालाच हरताळ फासण्यात येत आहे. या घोटाळ्याची समग्र चौकशी करून दोन दिवसांत अहवाल जाहीर करावा अन्यथा सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करू असा इशारा राजू टोपन्नावर यांनी दिला.

पत्रकार परिषदेला आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर हेगडे, रवींद्र बेल्लद, एम. के. सय्यद आदी उपस्थित होते.

Tags: