Belagavi

बुडामधील कथित घोटाळ्याची करणार उच्चस्तरीय चौकशी : कारजोळ

Share

बेळगाव नगरविकास प्राधिकरणात (बुडा) झालेल्या दीडशे कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जलसिंचन खात्याचे आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.

बेळगावात जिल्हा क्रीडांगणावर प्रजासत्ताक दिन समारंभात सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री कारजोळ यांनी ही माहिती दिली. बुडाकडून एकदा ऑनलाईन पद्धतीने अन एकदा ऑफलाईन पद्धतीने भूखंडांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यात दीडशे कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाला आहे. त्याबाबत माहिती विचारली असता, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आपला त्याचाशी संबंध नाही असे म्हटल्याचे पत्रकारांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर प्रतिक्रिया देताना कारजोळ म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांना कदाचित त्याबाबत माहिती नसावी. त्यांनी ती घेऊन देणे आवश्यक आहे. याबाबत चौकशी करून अहवाल मागवला जाईल. बुडामध्ये जो कथित घोटाळा झालाय त्याची नगरविकास खात्याच्या बेंगळूर येथील राज्यस्तरीय अधिकाऱ्यांकरवी चौकशी करण्यात येईल. यात जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. बाईट

लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून ग्रामीण मतदार संघात कुकर-मिक्सर वाटप केले जात असल्याबाबतच्या प्रश्नावर, लोकप्रतिनिधींनी निवडणूक पक्षाच्या तत्व-सिद्धांतावर, आपण केलेल्या विकासकामांच्या बळावर लढवली पाहिजे. आमिषे दाखवून नव्हे. त्यासाठी लकांची कामे करावी लागतात असे ते म्हणाले. रमेश जारकीहोळी यांनी हेब्बाळकर यांच्याविषयी केलेलं वक्तव्य माहित नाही. त्याची माहिती घेऊन बोलेन असे ते म्हणाले. खानापूर तालुक्यातील आमटे गावातील राणी चन्नम्मा निवासी कन्या शाळेचा उदघाटन समारंभ निमंत्रण पत्रिका छापून, वाटून देखील रद्द करण्यात आला, हे भाजपचे खालच्या स्तरावरचे राजकारण आहे असा आरोप आ. अंजली निंबाळकर यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना कारजोळ म्हणाले, कोणत्याही कार्यक्रमाचा एक शिष्टाचार असतो. संबंधित मंत्र्यांची वेळ ठरवून, मंजुरी घेऊन कार्यक्रम करावा लागतो. त्यांना वेळ नसेल तर जिल्हा पालकमंत्र्यांची वेळ घेऊन कार्यक्रम घेतला जातो. शिष्टाचार अधिकारी म्हणून त्याची माहिती किमान जिल्हाधिकाऱ्यांना तरी असली पाहिजे. या बाबतीत हे मला व अन्य कोणालाही माहित नाही. आमदारांनीच कुठे तरी लग्नाचे निमंत्रण दिल्यासारखे पत्रिका छापून स्वतःच कार्यक्रम जाहीर केला तर कसे? असा प्रश्न त्यांनी केला.

आगामी निवडणुकीत प्रभाव होईल या भीतीने सिद्दरामय्या, डी. के. शिवकुमार बेताल विधान करत सुटले आहेत. भ्रष्टाचारावरून त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणे म्हणजे राजकीय अपरिपक्वता आहे अशी टीका मंत्री गोविंद कारजोळ यांनी केली.
लोकशाहीत पारदर्शी पद्धतीने निवडणूक घ्यावी लागते. निवडणूक आयोग ती जबाबदारी पार पाडतो. सिद्दरामय्या, शिवकुमार हे मोफत देतो, ते मोफत देतो म्हणून रोज एक घोषणा करत सुटले आहेत. उद्या राज्यही मोफत देतो म्हणतील. पराभवाच्या भीतीने ते घोषणाबाजी करत सुटले आहेत. राजकारण्यांनी जिभेवर नियंत्रण ठेवले पाहिजे. मात्र सिद्धू, डीकेशी पोरकट विधाने करत आहेत असा टोला कारजोळ यांनी हाणला.
यावेळी आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील, एसपी डॉ. संजीव पाटील आदी उपस्थित होते.

Tags: