मतदारांना आमिषे दाखवणे, प्रलोभने देणे आणि विरोधकांवर आरोप करणे हे खालच्या स्तरावरचे राजकारण करणे हे काँग्रेसचे जुनेच धोरण आहे अशी सडकून टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.
बेंगळूर येथे “हर्षकला : राष्ट्रीय हातमाग मेळ्या”चे उदघाटन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, भाजप मतदारांना प्रलोभने दाखवत असल्याच्या काँग्रेसच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, काँग्रेस नेते विचित्र विधाने करता, त्याला स्वतःच उत्तर-प्रत्युत्तर देतात. बिनबुडाचे आरोप करतात.
ही त्यांची जुनी रीत आहे. आता निवडणूक आली म्हणून महिलांना दरमहा रक्कम, मोफत वीज देण्याचे आमिष ते दाखवत आहेत. कुनिगलमध्ये काँग्रेस आमदारांचे फोटो असलेले कुकर वाटण्यात आले. त्यावर वाणिज्य कर विभागाने छापे मारून चार जणांवर गुन्हे नोंदवून दंडही आकारला आहे. राज्यात पोलीस आहेत, कायदा आहे.
ते योग्य कारवाई करतील. अशाप्रकारे स्वतः प्रलोभने देत विरोधकांवर आरोप करून ते जनतेत गोंधळ निर्माण करून दिशाभूल करत आहेत. आगामी निवडणुकीत आपला प्रभाव होणार याची खात्री त्यांना पटली आहे. त्यामुळे पराभवाच्या भीतीनेच ते बेताल आरोप करत खालच्या स्तरावरचे राजकारण करत सुटले आहेत अशी टीका बोम्मई यांनी केली.
भ्रष्टाचाराच्या बाबतीत तक्रारी करायच्याच झाल्या तर काँग्रेसविरोधात 100 तक्रारी करता येतील. मुळात देशात काँग्रेसनेच भ्रष्टाचाराला जन्म दिलाय हे लोकांनाही ठाऊक आहे. अशांकडून आम्हाला धडा घ्यायचा नाहीय. त्यांना काय करायचे ते करू द्या, पण लोक काय ठरवायचे ते ठरवतील. कुनिगलमध्ये काँग्रेसने वाटपासाठी आणलेले कुकर वाणिज्य कर खात्याने जप्त केले आहेत. चौघांना दंडही आकारण्यात आलाय. कुनिगल कुकर वाटप प्रकरणी संपूर्ण माहिती घेऊन तपास केला जाईल असे बोम्मई यांनी सांगितले. राज्यात काँग्रेस सरकारच्या काळात अनेक मोठे घोटाळे झाले. त्यांच्या सत्ता काळातच सरकारी नोकऱ्यांची विक्री सुरु झाली. शिक्षक भरतीत परीक्षा न दिलेल्यानाही पास करण्यात आले. त्याचा सीआयडी तपास सुरुच आहे. पोलीस भरती घोटाळ्यात एका डीआयजीवर एफआयआर नोंदवण्यात आला. ते निवृत्तही होऊन गेले. मात्र कारवाई झाली नाही. घोटाळे करायचे, नोकऱ्या विकायच्या, चौकशीचे नाटक करायचे आणि गुन्हेगार सापडला की, तो कसा सुटेल याची व्यवस्था करायची हे काँग्रेसचे तंत्र आहे. लोकांनाही हे सगळे उमजून चुकले आहे. म्हणूनच लोकांनी गेल्यावेळी त्यांना घरी पाठवले आहे. येत्या निवडणुकीतही लोक त्यांना घरी पाठवतील असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.
एकंदर, काँग्रेस निवडणुकीवरून, सत्तेसाठी खालच्या स्तरावरचे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलाय.


Recent Comments