श्री क्षेत्र गाणगापूरचा काशी विश्वनाथ, उज्जैन महाकाल कॅरिडॉरच्या धर्तीवर विकास करण्यात येईल. यासाठी येत्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
मुख्यमंत्री बोम्मई यांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथील नृसिंह सरस्वती दत्तात्रेय पीठाला भेट देऊन दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले, गाणगापूर दत्तात्रेय पीठाला भेट देऊन दत्तात्रेयांचे दर्शन घेऊन राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेवण्याचे साकडे दत्तात्रेयांना घातले आहे. दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने राज्याचा विकास होईल. या क्षेत्राचा विकास करण्यासाठी 5 कोटी रुपये निधी दिला आहे. सुमारे 4-5 राज्यातील भाविक या तीर्थक्षेत्राला भेट देतात. त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा, यात्री निवास आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे.
मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा देण्यासह या भागाच्या विकासासाठी काशी विश्वनाथ, उज्जैन महाकाल येथे राबविण्यात आलेल्या कॅरिडॉरच्या धर्तीवर येथेही कॅरिडॉर उभारण्यात येणार आहे. यात 4 पदरी मार्ग उभारणी, देवस्थान आणि भीमा नदी परिसर स्वच्छता, यात्री निवासाची उभारणी आदी कामांचा समावेश आहे. काशी विश्वनाथ कॅरिडॉरचे काम पाहिलेले अभियंते यात सहभागी होणार आहेत. यासाठी कलबुर्गी जिल्हा प्रशासनाने 60 कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार केला आहे. या डीपीआरला मंजुरी देऊन येत्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येईल असे बोम्मई यांनी सांगितले.
राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाबाबतच्या प्रश्नावर, अर्थसंकल्प लोक कल्याणकारी असेल, प्रतीक्षा करा असे उत्तर बोम्मई यांनी दिले.


Recent Comments