येत्या 12 फेब्रुवारी रोजी बेंगळूरमधील येलहंका विमानतळावर एअरो इंडिया शो होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते त्याचे उदघाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
कलबुर्गी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, 1996 पासून कर्नाटक एअरो इंडिया शोचे आयोजन करत आहे. ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. आगामी शोसंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथसिंग, सैन्यदलांचे तसेच केंद्राच्या व राज्याच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत आता भाग घेतला आहे. या शोमध्ये जगभरातील विविध देशांतील आघाडीच्या विमान कंपन्या आणि संबंधित कंपन्यांचे सीईओ, प्रमुख, प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत असे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले.
श्री क्षेत्र गाणगापूर येथे देवदर्शनासाठी जाणार असून, विठ्ठल हिरूर यांच्या पुतळा अनावरण समारंभात भाग घेणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, श्री क्षेत्र गाणगापूरच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केले आहे. या क्षेत्राचा काशी विश्वनाथ, कालहस्ती उज्जैन कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास करण्याची योजना आहे. त्यासाठी 60 कोटी रुपये खर्चाची योजना जिल्हा प्रशासनाने तयार केली आहे. योजनेचा डीपीआर तयार झाला आहे. त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
कलबुर्गी, बीदर भागातील तूर डाळ उत्पादक नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडले आहेत. सुमारे दोन लाख हेक्टरमधील तूर डाळीचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत देण्यास सरकार वचनबद्ध आहे. सायंकाळी कृषी, अर्थ आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नुकसानभरपाई जाहीर करण्यात येईल असे बोम्मई म्हणाले. पीएसआय भरती घोटाळ्यातील आरोपी रुद्रगौडा याने सीआयडीचे तपासाधिकारी शंकरगौडा यांनी निर्दोष सुटकेसाठी तीन कोटी रुपयांची कथित लाच मागितल्याचा व्हिडिओ जारी केल्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना, तो एक आरोपी आहे, त्याने काय सांगितले, काय नाही याचा तपशील तपासाधिकाऱ्यांकडे आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, त्याला अटक, त्याची चौकशी, न्यायालयीन कोठडी आदी प्रक्रिया करण्यात आली आहे. जर कोणी अधिकारी दोषी आढळला तर कायद्याने जी कारवाई व्हायची ती होईल असे बोम्मई यांनी सांगितले.


Recent Comments