Belagavi

प्रस्तावित रिंग रोडच्या विरोधात झाडशहापूरजवळ चक्काजाम !

Share

प्रस्तावित रिंग रोडच्या विरोधात झाडशहापूर व परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बायका व मुलाबाळांसह शेकडोच्या संख्येने झाडशहापूर येथे एल्गार पुकारला. बेळगाव-खानापूर मार्गावर विराट रास्ता रोको आंदोलन छेडून चक्काजाम केला. यावेळी सरकारचा निषेध करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा बेळगाव रिंग रोडचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी केली.

बेळगाव रिंग रोडसाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला असून त्याच्या विरोधात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी आज सकाळी झाडशहापूर येथे बेळगाव-खानापूर हमरस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडले. बेळगाव रिंग रोड साठी तालुक्यातील 32 गावांच्या सुपीक शेतजमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग करत आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या असल्या तरी न्यायालयीन लढा बरोबरच रस्त्यावरील लढाई देखील महत्त्वाची असल्याने झाडशहापूर येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि बेळगाव जिल्हा प्रशासनाला आपली ताकद दाखवून दिली.

तसेच कोणत्याही परिस्थितीत तिबार पीक देणारी शेतजमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देणार नाही असा वज्रनिर्धार यावेळी करण्यात आला. रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज सकाळी लवकर संबंधित 32 गावातील शेतकऱ्यांसह तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येने आंदोलनाच्या ठिकाणी येताना दिसत होते. अनेक शेतकरी बैलगाड्यातून आपल्या कुटुंबियांसह आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलनात शेतकरी कुटुंबातील मुले आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या महिलांनी हातात रिंग रोड विरोधी फलक धरून रस्त्यावर ठिय्या मारला. या महिलांसह रास्ता रोकोत सहभागी होऊन जोरदार घोषणाबाजी करणारी शेतकऱ्यांची अजाण लहान मुले व शाळकरी मुले-मुली लक्ष वेधून घेत होते.

आंदोलनादरम्यान शेतकरी विरोधी रिंग रोड करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जय जवान जय किसान यासारख्या घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. या घोषणाबाजी बरोबरच दुसरीकडे भजनी मंडळाचा गजर देखील सुरू होता. त्यामुळे रास्ता रोकोच्या ठिकाणी एक वेगळेच वातावरण अनुभवावयास मिळत होते. आंदोलन स्थळी ठिकठिकाणी भगवे ध्वज फडकवण्यात आले होते.

याप्रसंगी बोलताना नंदीहळ्ळी येथील आंदोलनकर्ते शेतकरी परशुराम शेट्टप्पा कोलकार म्हणाले की, शेती म्हणजे आमची आई आहे. आईप्रमाणे आमची शेतजमीन आमचे मरेपर्यंत पालन पोषण करते. आता तीच शेतजमीन गेली तर आम्ही जगायचे कसे? आमच्या मुलाबाळांचे भवितव्य कसे सुरक्षित होणार? यासाठीच सुपीक शेतजमिनीच्या संपादना विरोधात आज आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहोत. जर सरकारने रिंग रोडचा प्रस्ताव त्वरित मागे घेतला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन छेडून आम्ही सरकारला धडा शिकवू, रिंग रोडला विरोध करण्याबरोबरच नंदीहळ्ळी मार्गे बागेवाडीपर्यंत जो रेल्वे मार्ग जाणार आहे, त्यालाही आमचा विरोध आहे असे सांगून रिंग रोडसाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमची शेतजमीन देणार नाही. त्यासाठी आमचा जीव गेला तरी बेहत्तर, असे परशुराम कोलकार यांनी स्पष्ट केले.

शुभांगी गोरल यांच्यासह अन्य एका शेतकरी महिलेने रिंग रोडला आपला तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट केले. रिंग रोडच्या सर्वेक्षणासाठी जर अधिकारी आल्यास त्यांना आम्ही जोरदार विरोध करून माघारी धाडू, रिंग रोडमुळे आमची तिबार पीक देणारी सुपीक शेत जमीन नष्ट होणार आहे. तेंव्हा सरकारने रिंग रोडऐवजी हवा तर फ्लाय ओव्हर ब्रिज बांधावा. आमच्या शेतजमिनी नष्ट झाल्या तर आमचा प्रपंच कसा चालणार? मुलांचे शिक्षण कशी होणार? असा सवाल करून रिंग रोडसाठी संपादन केल्या जाणाऱ्या शेतजमिनीची नुकसान भरपाई तसेच सरकारी नोकरी दिली जाईल असे सांगितले जात आहे, मात्र ती नुकसान भरपाई आम्हाला आजन्म पुरणार नाही. तसेच 5-10 हजाराच्या सरकारी नोकरीमुळे आमचे घरदार चालणार नाही आणि मुलांचे शिक्षणही होणार नाही. यासाठीच आम्हाला रिंग रोड नको, असे शुभांगी गोरल यांनी सांगितले.

यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, सरकारकडून जाणीवपूर्वक भूमिपुत्राला त्रास देण्याचा उद्योग सुरु आहे. रिंग रोडसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेत प्रामुख्याने मराठी भाषिक शेतकरी चिरडले जाणार आहेत. ३२ गावातील १२७२ एकर सुपीक जमीन गेल्याने अनेक शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने सर्वाना सोबत घेऊन हा लढा पुकारला आहे. आम्ही सरकारला कोणत्याही परिस्थितीत जमीन संपादित करू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

या रास्ता रोको आंदोलनात बेळगाव तालुका समितीचे सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी जि.पं. सदस्या सरस्वती पाटील, आर. एम. चौगुले, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. श्याम पाटील, ऍड. प्रसाद सडेकर, आर. आय. पाटील आदी नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली संबंधित 32 गावांमधील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनामुळे बेळगाव-खानापूर मार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tags: