Belagavi

आपला भ्रष्टाचार झाकण्यासाठी काँग्रेसचे आंदोलनाचे नाटक : बोम्मई

Share

भ्रष्टाचार आणि काँग्रेस अविभाज्य भाग आहेत. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार अन, भ्रष्टाचार म्हणजे काँग्रेस आहे.
काँग्रेस नेत्यांनी भ्रष्टाचारात पीएचडी मिळवली आहे. आपला भ्रष्टाचार झाकण्यासाठी काँग्रेस नेते भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाचे नाटक करत आहेत असा टोला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हाणला.

एका खासगी समारंभात भाग घेण्यासाठी बेळगावात आले असता, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या बेंगळुरमधील नियोजित भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाची खिल्ली उडवली. एका ठिकाणी आंदोलन केल्याने लोक येणार नाहीत म्हणून दहा ते पंधरा ठिकाणी कार्यकर्त्यांना घेऊन ते आंदोलन करणार आहेत. त्यांच्या काळात बंगळुरूमध्ये भ्रष्टाचाराचे अनेक घोटाळे झाले आहेत. बेंगळुर येथील मुख्य नाल्यावर त्यांच्या काळातच अतिक्रमणे झाली. आपला भ्रष्टाचार झाकण्यासाठी ते हे नाटक करत आहेत. पण लोकांना हे मान्य नाही.

लोकायुक्तांसारखी स्वतंत्र लोकशाहीवादी यंत्रणा त्यांनी आपला भ्रष्टाचार झाकण्यासाठीच बंद करून एसीबीला अधिकार देऊन प्रकरणे मागे घेतली. आम्ही आता पुन्हा लोकायुक्त यंत्रणा सुरु करून ती प्रकरणे तपासासाठी वर्ग करत आहोत. त्यामुळे त्यांचे बिंग बाहेर पडणार आहे असा दावा बोम्मई यांनी केला. भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जाहीर चर्चा करण्याच्या सिद्दरामय्या यांच्या मागणीवर पलटवार करताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, विधिमंडळातच यावर चर्चा करू असे आम्ही सांगितले होते. आठवडाभर आधी नोटीस देऊन काँग्रेसवाले पळून गेले. चर्चेला आलेच नाहीत. बेळगावातच अधिवेशनात चर्चा करू असे आम्ही म्हटले. अशा जाहीर चर्चेसाठी विधीमंडळाहून दुसरे कोणते मोठे व्यासपीठ असू शकते असा सवाल बोम्मई यांनी केला. विधानसभेतही त्याचा सामना करण्याची शक्ती आमच्यात आहे. आमने-सामने चर्चेला असो किंवा लोकांसमोर जाहीर चर्चा असो, आम्ही सगळ्याला तयार आहोत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन झालेल्या लवादाने दिलेल्या निर्णयानुसार म्हादई प्रकल्पाचे काम सुरु करण्यात येईल. लवादाचा आदेश हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाइतकाच महत्वाचा आहे. योजनेचा डीपीआर आला आहे. तेखोटा म्हणून सांगत काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप बोम्मई यांनी केला.

एकंदर, काँग्रेसच्या नियोजित भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलनाची मुख्यमंत्री बोम्मई यांनी चांगलीच खिल्ली उडवल्याचे यावेळी दिसून आले.

Tags: