Belagavi

रमेश जारकीहोळी यांच्या वक्तव्याचा पंचमसाली नेत्यांकडून निषेध

Share

बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथे नुकत्याच झालेल्या रमेश जारकीहोळी यांच्या चाहत्यांच्या सभेत आमदार रमेश जारकीहोळी यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात ‘वाईट कीडा’ असा शब्द वापरला होता. त्याचा निषेध करून माफी मागण्याची मागणी पंचमसाली समाजाच्या नेत्यांनी केली आहे.

बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पंचमसाली नेते म्हणाले की, सुळेभावी येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार रमेश जारकीहोळी यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना उद्देशून छी-थु असे टोमणे मारत त्यांना वाईट कीडा असे संबोधले आहे. यामुळे हेब्बाळकर यांचा अवमान झाला आहे. त्याबद्दल रमेश जारकीहोळी यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.

आमदार हेब्बाळकर यांच्या विरोधात वाईट शब्द वापरलेले तुम्हाला आवडले नाही. पण विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी मंत्री मुर्गेश निराणी यांना उद्देशून अशीच हलक्या शब्दांत टीका केली. त्याचा तुम्ही का निषेध केला नाही? या प्रश्नावर, हे आमच्या लक्षात आले नव्हते. हे दोन्ही नेते पंचमसाली समाजाचेच आणि एकाच पक्षाचे असले तरी त्यांच्यात वैयक्तिक वाद आहेत. त्यातून त्यांनी परस्परांवर चिखलफेक केली आहे. असे असले तरी त्यांनी वापरलेली भाषा चुकीचीच असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार रमेश जारकीहोळी हे अनुसूचित जातीचे असल्याने त्यांचा निषेध करण्यात आला का, या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला या नेत्यांनी नकारार्थी उत्तर दिले. स्त्रीला भारतात सन्मान, देवीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे कोणत्याही समाजाची असली तरी स्त्रीला वाईट बोलणे चुकीचे आहे. रमेश जारकीहोळी सुसंस्कृत मानले जाणाऱ्या भाजपमध्ये आहेत. स्त्रियांचा आदर करणारा हा पक्ष मानला जातो. तरीही ते आमदार हेब्बाळकर यांच्या विरोधात हलक्यावर बोलले आहेत, याचा आम्ही निषेध करतो. त्यामुळे रमेश जारकीहोळी यांनी त्यांची माफी मागितली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पंचमसाली समाजाला २-ए आरक्षण मिळावे यासाठी कुडलसंगमचे बसवजय मृत्युंजय स्वामींनी बेंगळूरमधील फ्रीडम पार्कवर सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बेळगावातील अनगोळमधील समाजाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव-बेंगळूर पदयात्रा काढली आहे. चन्नम्मा चौकात आज चन्नम्मा पुतळ्याचे पूजन करून या पदयात्रेला निरोप देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Tags: