संगीताच्या सप्तसुरांची उधळण करत मंत्रमुग्ध करणारे वातावरण केएलएस संस्थेच्या आयएमईआर सभागृहात निर्माण झाले होते. निमित्त होते, गुरुप्रसादनगर बेळगाव येथील सप्तस्वर संगीत विद्यालयाच्या वार्षिक संगीतोत्सवाचे !
हिंदवाडीतील आदर्शनगरातील आयएमईआर सभागृहात सुरमयी सकाळ अनुभवायला मिळाली. गुरुप्रसादनगर बेळगाव येथील सप्तस्वर संगीत विद्यालयाचा वार्षिक संगीतोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेच्या ४७ विध्यार्थी-विद्यार्थिनींनी एकाहून एक सरस गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गायन सादर करताना विद्यार्थ्यांनी सूर आणि स्वरांचा सुरेख मेळ साधत संगीतरसिकांचे कान तृप्त केले.

यासंदर्भात “आपली मराठी”ला माहिती देताना सप्तस्वर संगीत विद्यालयाच्या प्रमुख निर्मला प्रकाश अय्यर यांनी सांगितले की, आमचे विद्यालय यंदा स्थापनेचे २३ वे वर्ष साजरे करत आहे. वर्षातून दोनवेळा आम्ही गुरुपौर्णिमेला गुरुवंदन अन वार्षिकोत्सवानिमित्त संगीत संमेलन घेतो. सप्तस्वर संगीत विद्यालय अखिल भारतीय गांधर्व विद्यालय मान्यताप्राप्त असून त्यांच्या अभ्यासक्रमानुसार संगीत विशारद, संगीत अलंकार आदी अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देऊन परीक्षा घेण्यात येतात. एकूण ७७ विध्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. प्रदेशातील अमेरिका, रशिया, इंग्लंड तसेच भारतातील मथुरा, कोईमतूर, भटिंडा, बेंगळूर, पुणे आदी ठिकाणचे विध्यार्थी ऑनलाईन पद्धतीने माझ्याकडे संगीताचे शिक्षण घेत आहेत. तबला आणि हार्मोनियमचे प्रशिक्षणही आमच्याकडे दिले जाते.
अनेक सांगीतिक अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरेल असे “संगीत परिचय” नामक पुस्तक मी लिहिले असून, त्याला गांधर्व विद्यालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे देशभरातील संगीत अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे असे सांगून त्यांनी अधिक माहिती दिली.

कवी प्रा. एम. एस. इंचल यांनी वार्षिक संगीतोत्सवाचे उदघाटन केले. यावेळी सूर्यप्रकाश अय्यर, प्रमोद शेट, वामन वागूकर, जितेंद्र साबण्णावर, नारायण गणाचारी, निरंजन मूर्ती तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.


Recent Comments