Belagavi

“प्रयास” सामूहिक चित्र प्रदर्शनाला बेळगावात प्रारंभ

Share

बेळगाव आर्टिस्ट ग्रुप गुलमोहर बागच्या 34 सदस्य कलाकारांच्या “प्रयास” या सामूहिक चित्र प्रदर्शनाला बेळगावात प्रारंभ झाला. पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात मांडलेल्या पेंटीग्जमधून चित्रकारांच्या विस्मयकारक प्रतिभेचे दर्शन घडते आहे.

स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यासाठी 2018 मध्ये गुलमोहर बागची स्थापना करण्यात आली. या संस्थेतर्फे ‘प्रयास’ नावाचे प्रदर्शन टिळकवाडीतील हेरवाडकर शाळेजवळ वरेरकर नाट्यसंघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीत भरवण्यात आले आहे. त्याचे उदघाटन शरद तरडे (पुणे), जयंत हुबळी (बेंगळुरू) आणि पार्श्वनाथ नांद्रे (कोल्हापूर) यांसारख्या प्रख्यात कलाकारांच्या हस्ते करण्यात आले. 34 सदस्य कलाकारांनी रेखाटलेली विविध विषय, प्रसंगाधारित पेंटिंग्ज येथे मांडण्यात आली आहे. यात प्रत्येक कलाकाराचा कलात्मक प्रवास आणि वैयक्तिक पातळीवर त्यांनी साधलेली वाढ दिसून येते.

यासंदर्भात माहिती देताना संस्थेच्या सदस्या वृषाली मराठे यांनी सांगितले की, प्रदर्शनासाठी विशिष्ट अशी थीम नाही. परंतु 3X3 आकाराची पेंटिंग्ज आणण्यास सांगितले होते. यात मिनिएचर, ऑइल पेंटिंग्ज, वॉटर कलर, ऍबस्ट्रॅक्ट, क्युरेटर आदी प्रकारची मनमोहक पेंटिंग्ज मांडण्यात आली आहेत. गुलमोहर बागचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांची बॉल पेनने रेखाटलेली दुर्मीळ चित्रेही येथे पाहण्यास उपलब्ध आहेत. प्रदर्शन 22 ते 26 जानेवारी (2023) या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत लोकांना पाहण्यासाठी खुले असेल. सर्वानी येथे भेट देऊन प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

चित्रकार शिल्पा खडकभावी यांनी सांगितले की, स्थानिक चित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयास चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यात म्युरल्स, लँडस्केप आदी प्रकारची पेंटिंग्ज मांडण्यात आली आहेत. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन आनंद लुटावा असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, उदघाटन सत्रानंतर दुपारी क्युरेटर शरद तरडे (पुणे), जयंत हुबळी (बेंगळुरू) आणि पार्श्वनाथ नांद्रे (कोल्हापूर) यांनी चित्रकारांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. प्रदर्शनात दररोज संध्याकाळी 4.00 वाजता गॅलरीमध्ये कलाकारांद्वारे चित्रकला प्रात्यक्षिके आयोजित केली आहेत. 23 जानेवारीला कलावंत शिवाजी बेकवाडकर, 24 जानेवारीला अंजली पवार, 25 जानेवारीला स्नेहा कंग्राळकर आणि 26 जानेवारीला सचिन उपाध्ये विविध कला माध्यमांची प्रात्यक्षिके देणार आहेत.

Tags: