आमदार आणि मंत्र्यांच्या उदासीनतेमुळे सीमाभागातील कन्नड शाळा बंद पडत असल्याची खंत निडसोशी सिद्ध संस्थान मठाचे जगद्गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी यांनी व्यक्त केली.

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात अकराव्या कन्नड साहित्य संमेलनाचे उद्घाटन करून बोलताना स्वामीजी म्हणाले, कन्नडच्या अस्तित्वासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी अन्य भाषांना लोकप्रतिनिधी प्रोत्साहन देतात. त्यामुळे कन्नडचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सीमावर्ती भागात फक्त लेखक आणि साहित्य परिषदेच्या सदस्यांनी कन्नडसाठी लढा देणे पुरेसे नाही तर प्रत्येक घरात मुलांना कन्नड शिकवले पाहिजे. पालकांनी घरी मुलांशी कन्नड बोलले तरच मुले कन्नड बोलू-वाचू शकतील, असे ते म्हणाले.

यावेळी गुरुसिद्ध महास्वामी, आनंद महाराज, कन्नड साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षा मंगला मेटगुड्ड, तालुकाध्यक्ष प्रकाश अवलक्की, माजी मंत्री शशिकांत नाईक, शिवानंद गुंडाळे, सी. एम. दरबारे, एम. एस. होलीमठ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
हुक्केरी तालुक्याच्या हद्दीतील कन्नड शाळांच्या विकासासाठी सातत्याने संघर्ष करणार असून कन्नड कार्यासाठी व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांची एकजूट राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष प्रकाश अवलक्की यांनी सांगितले.

नंतर विविध चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार आणि विचारमंथन सत्र झाले.
यावेळी हुक्केरी तालुक्यातील विविध भागातील साहित्यिक, माजी मुख्याध्यापक, शालेय विद्यार्थी, कन्नड साहित्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, कन्नडप्रेमी उपस्थित होते.


Recent Comments