आ. अभय पाटील आयोजित आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला आज दुसऱ्या दिवशीही बेळगाववासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी युवा महोत्सवाचे आयोजन केले होते.
बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या पतंग महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी युवा महोत्सवाचे उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच दिवसभर सोलो सिंगिंग, डिबेट, वक्तृत्व स्पर्धांसहित विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. रविवार सुटीचा दिवस असल्याने असंख्य लोकांनी मालिनी सिटी येथील पतंग महोत्सवाला कुटुंबीय, मुले, नातवंडासोबत हजेरी लावून आनंद लुटला. अनेकांनी यावेळी उंच आकाशात विविध आकारांचे, रंगीबेरंगी पतंग उडवून आनंद लुटला.

पतंग उडविण्याचा आनंद लुटलेल्या अनेकांनी यावेळी बोलताना सांगितले की, आम्ही बालपणी पतंग उडविण्याचा आनंद लुटला होता. त्यानंतर आता आ. अभय पाटील यांच्यामुळे पुन्हा तो आनंद लुटता आला. मुलांना मोबाईलच्या गर्तेतून बाहेर पडून घराबाहेर येऊन नैसर्गिक वातावरणात पतंग उडविण्याचा आनंद घेता आला.
यावेळी बोलताना आ. अभय पाटील म्हणाले, शनिवारपासून बेळगावात आम्ही पतंग महोत्सव भरविण्यात आला असून, त्यात देशातील आणि परदेशातील अनेक पतंगबाजांनी भाग घेतला आहे. चार दिवसांच्या या पतंग महोत्सवात युवा महोत्सव, बाल महोत्सव, बलून फेस्टिव्हल, बॉडी बिल्डिंग स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामुळं बाहेरचे लोकही बेळगावात येणार असून, बेळगावच्या व्यापार-उदीमाला चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.

एकंदर, आ. अभय पाटील यांनी त्यांच्या हटके शैलीत बेळगावकरांना मनोरंजनाची पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ घेऊन नागरिकांनी या पतंग महोत्सवाला भेट देऊन आनंद लुटला पाहिजे.


Recent Comments