न्यायव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकार सर्व सुविधा, निधी देत आहे. देशात न्यायव्यवस्थेला सर्वाधिक सुविधा देण्यात कर्नाटक आघाडीवर असल्याची माहिती जलसिंचन मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
बेळगावात अतिरिक्त कोर्ट इमारतीचे उदघाटन, रामदुर्ग न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या आणि खानापूर येथील न्यायाधीशांच्या वसतिगृह इमारतीची आणि वकील भवनाच्या दुसऱ्या मजल्याच्या कोनशिलेचे अनावरण समारंभ उत्साहात पार पडला. त्यावेळी बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले की, न्यायव्यवस्थेला सर्वाधिक सुविधा देण्यात कर्नाटक आघाडीवर आहे. न्याययंत्रणेच्या सर्व गरज पूर्ण करून त्यासाठी आवश्यक साह्य, सुविधा आणि निधी देण्यात सरकारने कधीही कुचराई केलेली नाही. म्हादई, मेकेदाटू, अपर कृष्णा प्रकल्प आदी राज्याशी संबंधित जलविवादासंदर्भात संबंधित न्यायालये, लवादांमध्ये समर्पक युक्तिवाद करण्यास सरकारने प्राधान्य दिले आहे. त्यासाठी ज्येष्ठ आणि तज्ज्ञ वकिलांची नेमणूक केली आहे. न्यायालयांत तुंबून पडणाऱ्या खटल्यांचा वेगाने निपटारा करण्यासाठी न्यायव्यवस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यालाही सरकारने सर्व आवश्यक साह्य-सुविधा दिल्या आहेत. ग्राहक संरक्षण मंचानाही न्यायालयांप्रमाणे सरकार सर्व सुविधा, निधी देत आहे असे मंत्री कारजोळ म्हणाले.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि बेळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय न्यायाधीश वीरप्पा म्हणाले की, वकिलांनी खटल्यांची सुनावणी आणि निकाल वेळेत, लवकर लागण्यासाठी न्यायालयाना सहकार्य केले पाहिजे. यासाठी त्यांनी न्यायालयांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात वकिलांची भूमिका महत्वाची राहिली आहे. ती परंपरा वकिलांनी सुरु ठेवली पाहिजे. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. पण हल्ली पत्रकारिता काहीशी डळमळीत झाल्याचे चित्र आहे. पत्रकारिता आणि न्यायव्यवस्था डळमळीत झाली तर देशाची अधोगती होईल. म्हणून पत्रकारांनी कोणालाही न घाबरता निर्भयपणे पत्रकारितेचे व्रत जोपासले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर कर्नाटक उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जस्टीस प्रसन्ना वराळे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सचिन शंकर मगदूम, के. एस. हेमलेखा, अनिल कट्टी, बेळगाव जिल्हा मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश मुस्तफा हुसेन, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, खा. मंगल अंगडी, आ. अनिल बेनके, राज्य वकील संघटनेचे उपाध्यक्ष विनय मांगलेकर, बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, सरचिटणीस जी. एस. पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता एस. एस. सोबरद आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रोपण पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व अन्य मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून इमारतींच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी बेळगाव वकील संघटनेचे सदस्य, वकील, विविध खात्यांचे अधिकारी व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments