Belagavi

कोकितकर गोळीबार प्रकरणी खऱ्या आरोपीना अटक न केल्यास तीव्र आंदोलन : प्रमोद मुतालिक

Share

रवी कोकितकर यांच्यावरील गोळीबार प्रकरणात हिंदुविरोधी शक्तींचा हात आहे. यातील खऱ्या आरोपीना पोलीस पाठीशी घालत आहेत, असा आरोप करत महिन्याच्या आत यातील खऱ्या आरोपींवर कारवाई न केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिलाय.

बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना प्रमोद मुतालिक म्हणाले, श्रीराम सेनेच्या विराट हिंदू मेळाव्याच्या आधल्या दिवशी सायंकाळी रवी कोकितकर यांच्या कारवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे पोलीस म्हणतात. परंतु श्रीराम सेनेच्या विराट हिंदू मेळावा उधळून लावण्यासाठीच मेळाव्याच्या आधल्या दिवशी सायंकाळी हिंदू हल्लेखोरांनाच पुढे करून हिंदुविरोधी शक्तींनी हा कट रचलाय. पोलिसांना याची माहिती आहे. मात्र तपासाच्या नावाने ते दिशाभूल करत आहेत. आरोपींची सखोल चौकशी केलेली नाही. त्यांचे मोबाईल जप्त करून सखोल चौकशी केल्यास खरे आरोपी कोण हे स्पष्ट होईल. सध्या प्रकरणात संशयितांना बेळ्ळारी, धारवाडला पाठवतात. या प्रकरणात बैलहोंगलला पाठवले आहे. आणखी साथीदारांची चौकशी, अटक केलेली नाही. या प्रकरणात काही राजकारणी आहेत. त्यांचा बुरखा पोलिसांनी फाडायला हवा. जर रवी कोकितकर यांचा यात मृत्यू झाला असता तर कोण जबाबदार राहिले असते? असा सवाल मुतालिक यांनी केला.

या प्रकरणातील हिंदुविरोधी खऱ्या आरोपीना गजाआड करून एक महिन्याच्या आत कठोर कारवाई करावी अन्यथा श्रीराम सेनेतर्फे उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मुतालिक यांनी दिला. या संदर्भात गृहमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. राज्यपाल आणि एडीजीपीनाही निवेदन देणार आहे असे त्यांनी सांगितले. कोकितकर यांनी आपल्यावर पाळत ठेली जात असल्याचे कळवूनही पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यांची बोलेरो कार जप्त करून पोलीस स्थानकाच्या समोर लावली. पण ती उघडून बघून सांडलेले रक्त, बंदुकीची गोळी तपासणे अडीच तपास करणे आवश्यक होते. पण तो केला नाही. यावरून पोलीस काय तपास करत आहेत हे स्पष्ट होते. खऱ्या आरोपीना अजून अटक केलेली नाही. सरकारला हे जमत नसेल तर तसे सांगून त्यांनी माझ्या हातात पोलीस दल सोपवावे मी २४ तासात खऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळून दाखवेन असे मुतालिक म्हणाले. गोळीबार केल्याची घटना गंभीर आहे. पिस्तूल खिशात ठेवून पूजा केलेली नाही. दोन दुचाकींवरून येत आरोपींची फायर केल्याचे सीसीटीव्हीत दिसत असूही एकच दुचाकी जप्त केली आहे. दुसरी दुचाकी कुठे गेली याचा तपास करण्यात आलेला नाही. यामागे एका प्रभावी राजकारण्यांचा हात असून, पोलिसांवर दबाव आणून त्याने प्रकरणाचा तपास वळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही मुतालिक यांनी केला.

गोळीबाराच्या घटनेआधी आरोपींसोबत आपली बैठक झाली नसल्याचा खुलासा श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांनी यावेळी केला. ते माझे जुने मित्रच आहेत. त्यांच्या वैयक्तिक व्यवहारात मी सहभागी नव्हतो. माझ्यावर वैयक्तिक आरोप करण्यात आल्याने २-३ महिन्यांपूर्वी मी हे प्रकरण मिटवून टाका एवढेच सांगितले होते. ३-४ वर्षांपूर्वी एका मुस्लिम युवकाने माझा फोटो फेसबुकवर टाकून ‘इस को खतम करना है’ अशी पोस्ट टाकली होती अशी माहिती कोकितकर यांनी यावेळी दिली.

पत्रकार परिषदेला श्रीराम सेनेतर्फे दोन वकीलही उपस्थित होते.

Tags: