पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलबुर्गी जिल्ह्यातील मुळखेड येथे विविध योजनांचे लोकार्पण, शिलान्यास, तांडा निवासी नागरिकांना हक्कपत्रांचे वाटप आणि नारायणपूर डावा कालवा विस्तारीकरण, पुनश्चेतन व आधुनिकीकरण कामाचे उदघाटन केले. यावेळी कर्नाटक आणि देशाच्या विकासासाठी डबल इंजिन सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

संत सेवालाल महाराज आणि गाणगापूरचे गुरु दत्तात्रेय यांना नमन करून बंजारा भाषेत मोदींनी भाषणाची सुरवात केली. कर्नाटक सरकारच्या कामगिरीचे कौतुक करताना मोदी म्हणाले की, कर्नाटक सरकारने लोकांना सामाजिक न्याय देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. कर्नाटकातील लाखो बंजारा समाजासाठी आजचा दिवस दुर्मिळ आहे. 51 हजारांहून अधिक लोकांना हक्कपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. बोम्मई सरकारने सर्वांच्या विकासासाठी ठोस पाऊल उचलले आहे, असे ते म्हणाले. सामाजिक न्यायाचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांवर ताशेरे ओढताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पूर्वी सत्तेत असलेल्या सरकारांनी 30 वर्षांपूर्वी हक्कपत्रे देण्यासाठी तांडा रहिवाशांना 30 वर्षे खितपत ठेवले. व्होट बँक म्हणून त्यांचा वापर केला. मात्र आता सर्व वंचित वर्गाला त्यांचे पूर्ण हक्क मिळत आहेत. लोक आता धैर्याने आणि सन्मानाने जगू शकतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आज या व्यासपीठावर माझ्याकडून हक्कपत्र मिळालेल्या मातांनी मला आशीर्वाद दिले आहेत. त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला देशसेवेसाठी आणखी धैर्य मिळाले आहे. मी लमाणी लोकांचा मुलगा आहे, तुम्ही निश्चिन्त राहा. मी तुमचा मुलगा दिल्लीत बसून आहे असे, मोदी म्हणाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, पुढील 10 वर्षे सिंचन दशक म्हणून घोषित केले जाईल. राज्यातील सिंचन प्रकल्पांना 10 वर्षात प्राधान्य दिले जाईल. राज्यात 40.66 लाख हेक्टर सिंचन क्षेत्राचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत 30 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येत असून उर्वरित 10.66 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले.
यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत, केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, मंत्री आर. अशोक, मुरुगेश निराणी, प्रभू चौहान, आमदार पी राजीव, राजकुमार पाटील तेलकूर, दत्तात्रेय पाटील-रायवूर, खासदार उमेश जाधव, आमदार अविनाश जाधव, सुभाष गुत्तेदार, बसवराज मत्तिवाड इतर उपस्थित होते.


Recent Comments