Accident

मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघातात 22 ठार

Share

बस उलटून 13 प्रवाशांचा मृत्यू, तर कार-ट्रकच्या धडकेत 9 जणांनी गमावला जीव

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड व आणि कणकवलीमध्ये आज गुरुवारी पहाटे 2 भीषण अपघात घडलेत. कणकवलीजवळ खासगी बस उलटून झालेल्या अपघातात 13 प्रवाशी ठार, तर 23 जण जखमी झाले आहेत. बसमध्ये 36 प्रवासी होते. दुसरीकडे, रायगडमध्ये कार-ट्रकच्या धडकेत 9 जणांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये एका 4 वर्षीय मुलाचा समावेश आहे.
गोवा-मुंबई महामार्गावर कणकवलीजवळ खासगी बसचा ब्रेक अचानक फेल झाला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस उलटल्याने 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर, 23 जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर 9 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या 13 वर गेली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातात एकूण 9 प्रवाशी ठार झाले आहेत.

रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, आज पहाटे 4.45 वाजता रेपोली येथे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक व मुंबईकडून गुहागर कडे जाणाऱ्या कारचा अपघात झाला आहे. अपघातामध्ये 5 पुरुष 3 महिला आणि एका लहान मुलगी, अशा 9 जणांचा मृत्यू झाला आहे. एक लहान मुलगा जखमी असून त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवले आहे. सर्व मृत एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते सर्वजण गुहागर तालुक्यातील हेदवी येथे जात होते. एका नातेवाईकाच्या निधनाच्या शोकसभेला उपस्थित राहून हे सर्वजण परतत होते. त्याचदरम्यान काळाने त्यांच्यावर घाला घातला.

5 महिन्यांचे बाळ बचावले
रायगडमध्ये रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकचा पहाटे 5 वाजता समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की यात कारचा अक्षरश: चुराडा झाला. या गाडीतून प्रवास करणाऱ्या 9 जणांचा मृत्यू झाला. अपघातात 5 महिन्यांचे बाळ बचावल्याची माहिती मिळत आहे.

अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिस व वाहतूक पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक तातडीने पूर्ववत केली.

Tags: