Belagavi

बेळगावात 21 ते 24 जानेवारी दरम्यान पतंग महोत्सव

Share

येत्या 21 ते 24 जानेवारी दरम्यान, बेळगावचे आकाश विविधरंगी, विविध स्वरूपांच्या पतंगांनी भरून जाणार आहे. शहरातील मालिनी सिटी येथील मैदानावर आ. अभय पाटील यांच्या वतीने 11व्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आ. अभय पाटील यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. बेळगाव दक्षिण मतदार संघातील येडियुरप्पा मार्गावरील मालिनी सिटी येथे येत्या 21 ते 24 जानेवारी दरम्यान 11व्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात स्वित्झर्लण्ड, इंग्लंड, इस्टोनिया आदी सुमारे दहा देशातील आंतरराष्ट्रीय पतंगबाज सहभागी होणार असून, देशातील विविध राज्यातील 25 नामवंत पतंगबाज सहभागी होणार आहेत. सुमारे 200हुन अधिक प्रकारचे विविध आकारातील आणि विविध रंगांचे एकाहून एक आकर्षक पतंग या महोत्सवात पहायला मिळतील असे आ. अभय पाटील यांनी सांगितले.

चार दिवसांच्या काळात युवा महोत्सव, बाल महोत्सव, बलून फेस्टिव्हल आणि बॉडीबिल्डिंग स्पर्धा घेण्यात येणार आहेत. दरवर्षी पतंग महोत्सवाला 2.5 ते 3 लाख लोक भेट देतात. यंदा सुमारे 4 लाख लोक 4 दिवसांच्या या पतंग महोत्सवात सहभागी होण्याची शक्यता असल्याचे आ. अभय पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना पतंग महोत्सव आयोजन समितीचे चैतन्य कुलकर्णी म्हणाले, जगातील अनेक देशांत कोविडच्या नव्या लाटेचे थैमान सुरु झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पतंगबाजांना बोलावणे खूप कठीण झाले होते. पण अनेक पतंगबाजांनी सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे. गेली 10 वर्षे अत्यंत यशस्वी ठरलेला बेळगाव पतंग महोत्सव आता केवळ राज्यस्तरावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा महोत्सव ठरला आहे. यंदाचा 11 वा पतंग महोत्सवही यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संदेश कट्टी, गणेश मळलीकर उपस्थित होते.

Tags: