Belagavi

राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरात मुलाने लावले विधवा आईचे लग्न

Share

विषय गंभीर तिथं कोल्हापूर खंबीर असं म्हटलं जातं. राजर्षी शाहू महाराजांच्या समाज सुधारकी परंपरेचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात एका मुलानेच आपल्या विधवा आईचा पुनर्विवाह घडवून या परंपरेचा वसा जपलाय.

आई रत्ना, वडील नारायण आणि मुलगा युवराज असे छोटे आणि सुखी कुटुंब होते त्यांचे. पण दोन वर्षांपूर्वी शेले कुटुंब पोरके झाले. युवराजचे वडील नारायण यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर युवराजची आई रत्ना यांनी जणू जगणे सोडले होते. त्या सारख्या निराश राहायच्या. आईचे हे दुःख मुलाला सहन होईना. अखेर मुलानेच आपल्या आईच्या पुनर्विवाहाची मुहूर्तमेढ रोवली आणि धाडसी निर्णय घेऊन स्वतः आईचा विवाह लावून दिला.

कोल्हापुरात शिंगणापूर येथे राहणारा युवराज सोंगी भजन करतो. यामुळे वारंवार फिरतीवर असतो. घरी एकटी राहणाऱ्या आईची त्याला खूप काळजी असायची. त्यात पतिनिधनानंतर रत्ना यांच्या कपाळावर कुंकू, हातात चुडा दिसेनासा झाला. तेव्हापासून युवराज रत्ना यांनी कुंकू लावून हातात इतर महिलांप्रमाणे बांगड्या घालाव्यात, असा आग्रह धरत होता. पण समाज आणि रूढी-परंपरा यांचा पगडा मनावर असल्याने रत्ना मुलाच्या या विचारांना त्या विरोध करत होत्या. त्या निराश राहायच्या हे पाहून त्याने आईच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणायचा ठरवला. स्वतः पुढाकार घेऊन युवराज आपल्या विधवा आईसाठी वर शोधत होता. आईला जेव्हा हे त्याने सांगितले तेव्हा रत्ना यांनी विरोधच केला. पण एकटीने आयुष्य कसे काढणार? किती दिवस तू अशी रडत बसणार? तुला तुझे आयुष्य नव्याने जगण्याचा अधिकार आहे. जर पत्नीच्या निधनानंतर पुरुष लग्न करून नवे आयुष्य सुरू करू शकतो तर महिलांनी रडत का बसायचे, असे अनेक सवाल उपस्थित करत त्याने आईची समजूत काढली. मुलाच्या हट्टापायी रत्ना यांनी मनाची समजूत घातली. पण समाज काय म्हणेल याची चिंता त्यांना सतावत होती. अखेर धाडस करून रत्ना यांनी आसपास राहणाऱ्या आपल्या मैत्रिणींना मुलाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. शेजारी राहणाऱ्या महिलांनी रत्ना यांनी मुलाचे ऐकावे आणि लग्न करून नवे आयुष्य सुरू करावे असे सांगितले.
आईसाठी पाहिला नात्यातीलच वर

युवराज याने आईसाठी नात्यातील एका घटस्फोटित वराची म्हणजे मारुती व्हटकर यांची निवड केली होती. मारुती व्हटकर यांच्यासोबत बोलून युवराजने विवाह पक्का केला आणि नातेवाईक, शेजारी यांच्या उपस्थितीत रत्ना यांचा पुनर्विवाह लावून दिला. १२ जानेवारी रोजी रत्ना आणि मारुती यांचा विवाह पार पडला. त्याच्या पुढारलेल्या विचाराचे आणि कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हेरवाड ग्रामस्थांनी विधवा प्रथा बंद करून राज्यभर एक आदर्श निर्माण केला होता. पण त्याहीपुढे जाऊन युवराज याने स्वतः आईचा विवाह लावून दिला. विधवांनादेखील नवे आयुष्य सुरू करण्याचा पूर्ण अधिकार आहे हे कृतीतून दाखवून दिले. पतीच्या निधनानंतर महिलांना विधवेसारखे जगावे लागू नये, कपाळावर कुंकू न लावणे, हातात बांगड्या न भरणे ही पद्धत बंद करण्याचा ठराव कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने नुकताच केला होता. त्यानंतर जिल्ह्यातील ५००हुन अधिक ग्राम पंचायतींनी असे ठराव करून विधवा महिलांना सामान्य महिलेप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला. आता त्याही पुढे जाऊन युवराजने विधवा आईचा पुनर्विवाह करून नवा आदर्श निर्माण केलाय.

Tags: