Haveri

अंबिगर चौडय्या समाजाचा ‘एसटी’त समावेशाचा लवकरच निर्णय : बोम्मई

Share

अंबिगर चौडय्या समाजाचा ‘एसटी’त समावेशाचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले. त्याशिवाय अंबिगर चौडय्या गुरुपीठाला पाच कोटी रुपये अनुदानही वितरित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर येथे झालेल्या श्री निजशरण अंबिगर चौडय्या सुक्षेत्र नरसेपूर गुरुपीठाच्या वतीने श्री निजशरण अंबीगर चौडय्या यांच्या 903 व्या निजशरण जयंती व 5 व्या शरण संस्कृती उत्सवात सहभागी होऊन बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी हे आश्वासन दिले.

बोम्मई पुढे म्हणाले, अंबीगर चौडय्या समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. या संदर्भात मी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्याशी चर्चा केली आहे. त्याशिवाय भारताच्या रजिस्ट्रार जनरलकडेही याबाबतचा प्रस्ताव पाठवून दिला आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यांचा अहवाल आल्यावर मंत्रिमंडळात याविषयी ठराव मंजूर करून मंजुरीसाठी केंद्राला पाठवण्यात येईल. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि भारताच्या रजिस्ट्रार जनरलकडेही पुन्हा एकदा पाठपुरावा करणार असल्याचे बोम्मई यांनी सांगितले.


अंबीगर चौडय्या गुरुपीठाला येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मी मुख्यमंत्री झाल्यावर दहा कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी पाच कोटी दिले आहेत. उर्वरित पाच कोटीही लवकरच देण्यात येतील. अन्य मागासवर्गीय मठांसोबतच या गुरुपीठालाही दोन कोटी रुपये दिले आहेत. या सोबतच हावेरी येथे समाजाच्या समुदाय भवनासाठी दोन कोटी रुपये अनुदानाची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्याची ग्वाही मुख्यमंर्त्यानी दिली. निजशरण अंबीगर चौडय्या यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून नव्या काळानुसार शिक्षणाला प्राधान्य देऊन विविध क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन मुख्यमंती बोम्मई यांनी अंबीगर चौडय्या समाजाच्या विध्यार्थ्यांना व युवकांना केले.

याप्रसंगी गुरुपीठाचे शांतलिंग स्वामीजी यांचे पिठारोहण व सन्मान समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला राज्यभरातील अंबीगर चौडय्या समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: