शासनकर्त्यांना एकवेळ आंदोलने, चळवळ दडपता येईल, पण सीमाभागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात जाण्याची आंतरिक तळमळ दडपता येणार नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक विजय चोरमारे यांनी कुद्रेमनी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
बेळगाव तालुक्यातील कुद्रेमनी गावात आज, रविवारी बलभीम साहित्य संघातर्फे आयोजित 17व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना विजय चोरमारे पुढे म्हणाले, सीमाभागात मराठी साहित्य संमेलन होताना मराठी-कन्नड वादाची चर्चा होणे स्वाभाविकच आहे. साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी या वादातील राजकारण समजून घ्यायला पाहिजे.

सीमाभागातील मराठी बांधवाना महाराष्ट्रात यायचंय ही वस्तुस्थिती आहे. त्यांची ही भावना त्यांनी कधीही लपवली नाही. सातत्याने लोकशाहीपुर्ण मार्गाने, संविधानाच्या चौकटीत राहून त्यांनी ही आंतरिक तळमळ व्यक्त केली आहे. ही तळमळ समजून घेणं हे शासनकर्त्यांचं पहिलं कर्तव्य आहे, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. तुम्ही त्यांची आंदोलनं, चळवळ दडपू शकाल, पण त्यांची ही आंतरिक तळमळ दडपू शकणार नाही. ही तळमळ शासनकर्त्यांनी समजून घेतल्यास ते कधीही अतिरेकीपणाने वागणार नाहीत. मराठी भाषिकांशी व्यवहार करताना शासनकर्त्यांनी ते या राज्याला मानणारे आहेत, आपल्याच राज्याचे रहिवासी आहेत असे मानून त्यांची ही आंतरिक तळमळ समजून घेतली पाहिजे असे मत विजय चोरमारे यांनी मांडले.
संमेलनाचे उदघाटन करून बोलताना माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी, सीमाभागात मराठी भाषेची, अस्मितेची गळचेपी होतेय. ती थांबवण्यासाठी सर्वानी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आमचा अन्य कोणत्याही भाषेला विरोध नाही. सर्व भाषा या भगिनी आहेत हीच आमची भूमिका आहे. परंतु कर्नाटक सरकार या ना त्या निमित्ताने मराठी भाषेची, अस्मितेची गळचेपी करतेय. पोलिसांच्या माध्यमातून साहित्य संमेलने बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्ही पोलिसांना दोष देणार नाही. परंतु आमच्या भाषेचा जयघोषही थांबविणार नाही. धडा आणि लढा याची शिकवण आम्हाला आमच्या वडिलधाऱ्यांनी आम्हाला दिली आहे. मराठी ही आमच्या आईची भाषा आहे, ती कोण्या राष्ट्रीय पक्षाने आम्हाला विकत दिलेली नाही. राष्ट्रीय पक्ष आम्हाला आमिषे दाखवताहेत. पण आम्ही त्यांना बळी पडणार नाही. आमच्या अस्मितेचा लढा आम्ही लढत राहू असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी ढोल-ताशा आणि झांजपथकाच्या गजरात ग्रंथराज ज्ञानेश्वरीची संमेलन स्थळापर्यंत शानदार दिंडी काढण्यात आली. सर्व प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांना मिरवणुकीने संमेलन स्थळी नेण्यात आले. दिंडीत गावातील वारकरी मंडळाच्या सदस्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात तल्लीन होऊन भजन-कीर्तन सादर केले. चिमुकली मुले-मुली महापुरुषांच्या आणि पारंपरिक वेशात हाती भगवा ध्वज घेऊन सहभागी झाली होती. उदघाटन सत्रानंतर झालेल्या काव्यमैफलीत मंगसुळीचे आबासाहेब पाटील, कऱ्हाडचे कवी थळेंद्र लोखंडे, कुद्रेमनीचे कवी अमृत पाटील, शिवाजी शिंदे, बेळगावच्या हर्षदा सुंठणकर आदी कवी-कवयित्रींनी काव्यरचना सादर केल्या. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळासी गावचे कथाकथनकार बाबा परीट यांचा कथाकथनाचा कार्यक्रम झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील गजरगावचे सिनेनाट्य अभिनेते आत्माराम पाटील यांनी “आनंदाने जगूया” या विषयावर प्रबोधन केले. संमेलनाला महाराष्ट्र एकीकरण समितीने नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, डॉ. बी. एम. सातेरी, शाम पाटील, कुद्रेमनी ग्रापं अध्यक्षा रेणुका रामूनाई आदींसह बेळगाव शहर व तालुक्यासह कुद्रेमनी पंचक्रोशीतील मराठी साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments