Belagavi

भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटलांची जीभ घसरली ! पत्रकारांनी धरले चांगलेच धारेवर

Share

बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार आणि भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांची पत्रकार परिषदेत जीभ घसरली. ‘आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून मिक्सर-कुकर वाटप होत असूनही तुम्ही ते दाखवत नाही, ही कसली दादागिरी करताय’ असा शब्दप्रयोग त्यांनी केल्याने पत्रकारांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. अखेर माफी मागून त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

होय, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, राज्य प्रवक्ता ऍड. एम. बी. जिरली आणि उत्तरचे आ. अनिल बेनके यांनी आज बेळगावात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चॅनेलवाल्यांकडून ‘आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून मिक्सर-कुकर वाटप होत असूनही तुम्ही ते दाखवत नाही, ही कसली दादागिरी करताय’ असा शब्दप्रयोग त्यांनी केल्याने पत्रकारांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. आ. लक्ष्मी हेब्बाळकर कुकर-मिक्सर वाटत असतील, पण तुम्हीही तुमच्या वाढदिवसाला ताटे, ग्लास वाटलीतच ना? असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर संजय पाटील पुन्हा भडकले. हेब्बाळकर रांगोळी स्पर्धांच्या नावाखाली मिक्सर-कुकर वाटतात. गणेशपूर, नावगे क्रॉस, एम. के. हुबळीकडे मिक्सर-कुकर कँटर उभे आहेत. लोकांना नारळावर हात ठेवून मते देण्याची शपथ घ्यायला लावून मिक्सर-कुकर वाटप सुरु आहे. तुम्ही ते लोकांना दाखवायला पाहिजे. युद्धात कोणी तलवार घेऊन आला तर हात जोडून उभे राहिल्यास तो मारून पुढे जाईल असे संजय पाटील म्हणाले. त्यावर भाजप राज्य प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी त्यांना शांत केले. अखेर माफी मागून संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

बेळगाव ग्रामीण मतदार संघात अनेक इच्छुक आहेत. काहींनी तर कार्यालये थाटून प्रचारही सुरु केला आहे. त्यासाठी पक्षाची परवानगी घेतली आहे का? जिल्हाध्यक्ष या नात्याने तुम्ही काय कारवाई केली? या प्रश्नावर संजय पाटील म्हणाले, धनंजय जाधव, नागेश मन्नोळकर, विनय कदम किंवा अन्य कोणी असो, आमदारकीसाठी इच्छुक असणे यात गैर काहीच नाही. जिल्हाध्यक्ष या नात्याने मी वरिष्ठांना अहवाल दिला आहे. वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील पक्षाच्या इनडोअर बैठकीत वरिष्ठ त्यांना कानपिचक्या देतात. जे हट्टी आहेत, ऐकणार नाहीत त्यांना पक्षात भवितव्य नाही असे त्यांनी सांगितले.

मी महाराष्ट्रात जन्मलो, वाढलो. पण येथील जनतेने माझ्यावर प्रेम केले, दोनदा आमदार केले. येथील जनतेचे, भूमीचे ऋण मी फेडू शकणार नाही. कोणी बंडखोरी केली, कोणी विरोधकांनी काही बोलले म्हणून मी त्रास करून घेणारा नाही. उमेदवारी मिळालीच पाहिजे असा माझा हट्ट नाही. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करेन, पक्षाशी एकनिष्ठ राहीन हे मी अनेकवेळा पक्षाच्या व्यासपीठावरही सांगितलेय आणि आताही सांगतोय असे संजय पाटील म्हणाले.

एकंदर, जीभ घसरल्यामुळे संजय पाटील यांना पत्रकारांची माफी मागून पत्रकार परिषद घ्यावी लागली. यावेळी भाजप राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली, आ. अनिल बेनके आदी उपस्थित होते.

Tags: