मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज विधानसौधसमोर श्री जगज्योती बसवेश्वर आणि नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या पुतळा उभारणीसाठी भूमिपूजन केले.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, विधानसौधसमोर श्री जगज्योती बसवेश्वर आणि नाडप्रभू केम्पेगौडा या दोन महापुरुषांच्या पुतळ्यांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आज भूमिपूजन केले आहे. येत्या एक-दोन महिन्यात या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल. या दोन्ही महापुरुषांचे कर्नाटकाच्या उभारणीत मोठे योगदान आहे. श्री जगज्योती बसवेश्वर यांनी संपूर्ण जगाला सर्वप्रथम लोकशाहीची देणगी दिली. मॅग्ना कार्टाच्या आधी त्यांनी लोकशाहीची, लोकांच्या संसदेची संकल्पना मांडली.

समताधारित समाजरचनेची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणली. त्याचप्रमाणे राज्याचे दैवत केम्पेगौडा यांनी बेंगळूर शहर आणि राज्याच्या विकासासाठी उत्कृष्ट दर्जेदार प्रशासन राबविले. एक उत्कृष्ट, आधुनिक प्रशासन व्यवस्था राबवून त्यांनी प्रदेशाचा विकास केला. या दोन्ही महापुरुषांचे प्रशासन, कार्य मूल्याधारित होते. त्याच मूल्याधारित विकास, प्रशासनाची संकल्पना, परंपरा पुढे नेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे बोम्मई म्हणाले.


Recent Comments