कडोली येथील श्री छत्रपति शिवाजी महाराज मैदानावर उद्या शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता संपुर्ण यमकनमर्डी विधानसभा मतदार संघातील बहुजन समाजाच्या वतीने कडोलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठापना वर्धापन दिन, राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स्वराज्य संकल्प महामेळावा आयोजित केला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे त्याला संबोधित करणार आहेत.
याविषयी कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये, म. ए. समिती युवा आघाडी अध्यक्ष भाऊराव गडकरी आणि माजी जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना भाऊराव गडकरी म्हणाले, नव्या पिढीला महापुरुषांचे जीवन, आदर्श, विचार यांची माहिती मिळावी, त्यापासून त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा स्वराज्य संकल्प महामेळावा आयोजित केला आहे. कडोलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठापना वर्धापन दिन, राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त त्याचे आयोजन केले आहे. सुप्रसिद्ध अभिनेता व खासदार डॉ. अमोल कोल्हे त्याला संबोधित करणार असून, कसबा नुल येथील रामनाथन् समाधीमठाचे राष्ट्रीय धर्माचार्य परमपूज्य भगवानगिरी महाराज, कडोली दुरदुंडेश्वर मठाचे गुरुबसवलींग स्वामीजी तसेच कांग्रेस कार्याध्यक्ष व यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार सतीश जारकीहोळी आदी मान्यवरही मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी बोलताना माजी जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे म्हणाले, कडोलीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीला ४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कडोली येथील श्री छत्रपति शिवाजी महाराज मैदानावर उद्या शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता संपुर्ण यमकनमर्डी विधानसभा मतदार संघातील बहुजन समाजाच्या वतीने हा स्वराज्य संकल्प महामेळावा आयोजित केला आहे. यमकनमर्डीचे आ. सतीश जारकीहोळी हे सर्व समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारे, सर्व महापुरुषांचे विचार समाजात रुजण्यासाठी प्रयत्न करणारे एकमेव आमदार आहेत. त्यांच्या पुढाकाराने हा मेळावा होत आहे. त्याला सर्वानी उपस्थित राहून तो यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पत्रकार परिषदेला काकती ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सागर पिंगट, सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी पावणोजी, मुचंडी ग्रा. पं. उपाध्यक्ष संदीप जक्काणी, बेळगाव एपीएमसीचे माजी अध्यक्ष अनंत पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments