Belagavi

बेळगावात काँग्रेसच्या प्रजाध्वनी बस यात्रेला भव्य प्रारंभ

Share

काँग्रेसच्या बहुचर्चित प्रजाध्वनी यात्रेला आज बेळगावात चालना देण्यात आली. ‘भाजप हटाओ देश बचाओ’चा नारा देत बेळगावातील टिळकवाडीतील काँग्रेस विहीर-वीरसौधपासून बुधवारी काँग्रेसच्या प्रजाध्वनी बस यात्रेला प्रारंभ करण्यात आला.

काँग्रेस प्रदेश प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला, केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बुधवारी बेळगावमधील टिळकवाडीतील वीरसौध येथून प्रजाध्वनी बस यात्रेला प्रारंभ करण्यात आला. भाजपच्या जनविरोधी धोरणांबद्दल राज्यभरातील जनतेमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने आणि काँग्रेसला राज्यात परत सत्तेवर आणण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. 99 वर्षांपूर्वी 1924 मध्ये बेळगावात तत्कालीन काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. महात्मा गांधींनी काँग्रेसच्या या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविले होते. ब्रिटिश सरकारविरुद्ध तीव्र लढा देण्याची शपथ वेळगावातील या ऐतिहासिक वीरसौधमध्ये घेण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हुसकावून लावून काँग्रेसला सत्तेवर आणण्याच्या उद्देशाने केपीसीसीने बस यात्रेच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभी वीरसौधमधील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला काँग्रेस नेत्यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर काँग्रेस नेते काँग्रेस रोडपर्यंत चालत आले. या ठिकाणी काँग्रेस विहिरीतून कळशांतून आणलेले पाणी रस्त्यावर ओतून, रस्ता झाडून स्वच्छता करण्यात आली.

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले की, बेळगाव हे ऐतिहासिक ठिकाण आहे. येथून आम्ही आजपासून प्रजाध्वनी यात्रेला सुरुवात केली आहे. राज्यातील भ्रष्ट भाजप सरकारचे कुशासन आणि द्वेषाचे राजकारण यासह भाजपवरील आरोपांची यादी आम्ही जनतेसमोर ठेवणार आहोत. संपूर्ण राज्य सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहे. ते कुशासन आणि द्वेषाचे राजकारण करत आहेत. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. भाजपच्या पापांची टोपली भरली आहे. त्यामुळे भाजपच्या पापांची आणि भ्रष्टाचाराची घाण साफ करण्यासाठी आम्ही बेळगावातून जनध्वनी बस यात्रा सुरू केली आहे, असे ते म्हणाले.

 

केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले की, बेळगावच्या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन कर्नाटकातील जनतेच्या वेदना आणि त्यांची मते लोकांसमोर मांडण्याचा कार्यक्रम म्हणजे प्रजाध्वनी यात्रा आहे. 1924 मध्ये, महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी बेळगावच्या वीरसौध परिसरात येथे काँग्रेसचे अधिवेशन आयोजित केले आणि ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याचा प्रस्ताव मांडला. त्याचप्रमाणे राज्यातील भ्रष्ट भाजप सरकारच्या विरोधात आम्ही वीरसौधपासून प्रजाध्वनी यात्रा काढत आहोत. येथील काँग्रेस विहिरीतून मुलींनी आणलेले पाणी ओतून राज्यातील भाजप सरकारचा भ्रष्टाचार धुवून काढू. भाजपचे भ्रष्टाचारी सरकार पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या ‘बी रिपोर्ट’च्या सरकारपासून राज्याची सुटका करून काँग्रेसचे मजबूत सरकार आणून, जनतेला नवी आशा देण्याच्या उद्देशाने प्रजाध्वनी यात्रा काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरेल असे काँग्रेसचे सरकार होते. तरुणांसाठी रोजगार निर्माण करणारे सरकार होते. आता ते गेले. राज्यात साडेतीन वर्षे सत्ता गाजवणारी भाजप जनतेसाठी शाप ठरली आहे. बेळगावचे कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ‘बी रिपोर्ट’ सादर करून हे प्रकरण दाबण्यात आले. हा कुठला न्याय? असा सवाल डीकेशिनी केला.

बेळगावात महापूर आल्यावर कोणता मंत्री धावून आला? बेळगावसाठी मोठे योगदान देणारे केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचा कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे पार्थिवही सरकारला बेळगावात आणता आले नाही असा टोला त्यांनी हाणला.

प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला, केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, सलीम अहमद, माजी मंत्री एच. के. पाटील, काँग्रेस राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील, बसवराज रायरेड्डी, पी. टी. परमेश्वर नायक, आर. व्ही. देशपांडे, माजी मंत्री विनय कुलकर्णी, डी. बी. इनामदार, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर, चन्नराज हट्टीहोळी, महांतेश कौजलगी, बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी आदी उपस्थित होते.

Tags: