बेळगावातील सारथीनगरातील अवैध प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी एक दिवसाची मुदत देऊन यासाठी प्रसंगी अयोध्येच्या धर्तीवर आंदोलन करण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे.
बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सारथीनगर येथे रविवारी सायंकाळी झालेल्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या संदर्भात उद्या जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची भेट घेऊन दुपारी संघर्षाची रूपरेषा ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. सारथीनगरात घर बांधण्याची परवानगी घेऊन गेल्या एक वर्षापासून या घराचे मशिदीत रुपांतर करण्यात आले आहे. एवढे होऊनही पालिका अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने सर्वांच्याच रोषाचे कारण ठरले आहे. या पार्श्वभूमीवर नेते आदिनाथ गावडे यांनी सोमवारपर्यंत बेकायदा मशीद रिकामी न केल्यास भव्य मोर्चा काढून त्याच मशिदीचे मंदिरात रूपांतर करू, अशी घोषणा केली. या बैठकीत सामील झालेल्या सर्वांनी श्री रामाचा नामजप करून आपली संमती दर्शविली.
यावेळी बोलताना माजी आमदार संजय पाटील यांनी, सर्वानी या प्रश्नी एकजुटीने राहून विरोध करण्याचे आवाहन केले. सरकार आपलेच आहे आणि आम्ही न्यायोचित मागणी करत आहोत, त्यामुळे आपल्याला न्याय जरूर मिळेल. परंतु आधी वकीलांशी कायदेशीर बाबींवर चर्चा करून जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना भेटून हा विषय समजावून सांगू. त्यांनी वादग्रस्त प्रार्थनास्थळ न हटविल्यास सर्वानी मिळून एकीने आंदोलन करून हा प्रश्न धसास लावू असे त्यांनी सांगितले. सिटी सर्व्हे आणि बेळगाव महापालिकेचे अधिकारी ग्रामीण भागातील आमदारांच्या इशाऱ्याप्रमाणे नाचत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना उद्या भेटून आपली भूमिका मांडण्याचे काम करू, अशी सूचना त्यांनी केली.
भावकाण्णा लोहार, उज्वला बडवण्याचे, दीपा कुडची, धनंजय जाधव आदींनी विचार मांडून वादग्रस्त प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी बजरंग दलाचे बालोपासना प्रमुख भावकाण्णा पवार, जिल्हा सहसंचालक सुनील गौरण्णा यांच्यासह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक रहिवासी उपस्थित होते.


Recent Comments