श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर झालेला हल्ला, बेळगावातील आजचा विराट हिंदू धर्म मेळावा उधळून लावण्यासाठी करण्यात आलाय. पोलिसांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अन्यथा आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत असा इशारा श्रीराम सेना संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी दिलाय.
श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार केल्याची घटना काल शनिवारी सायंकाळी हिंडलगा तुरुंगाजवळ घडली होती. श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी आज बेळगावातील केएलई इस्पितळाला भेट देऊन गोळीबारात जखमी झालेले श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुतालिक म्हणाले, हल्ल्यात कोकितकर यांच्या मानेला खरचटले आहे. पण रक्तस्त्राव झाला आहे. त्यांची व त्यांच्या चालकाची प्रकृती स्थिर आहे. बेळगावात धर्मवीर संभाजी महाराज उद्यानात होणार आजचा आमचा विराट हिंदू धर्म मेळावा उधळून लावण्यासाठी हा हल्ला करण्यात आलाय असा दावा त्यांनी केला. पण हा मेळावा होईलच आणि यशस्वी होईल, कोणीही न घाबरता धैर्याने मेळाव्यास उपस्थित रहावे.
हिंडलगा तुरुंगाजवळ हा गोळीबार करण्यात आलाय. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी हल्लेखोरांना तातडीने अटक करावी आणि त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे असे मुतालिक म्हणाले. या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना भेटून मागणी करणार आहे, जेथे हल्ला झाला त्या ठिकाणाचीही पाहणी करणार आहे. कोकितकर व त्यांचा चालक श्रीरामाच्या, संघटनेच्या कृपेने वाचले आहेत. त्यांना आज संध्याकाळच्या मेळाव्यात भागही घेता येईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. पण ज्यांनी हा हल्ला केलाय त्यांना मी एक इशारा देऊ इच्छितो, राज्यात आणि देशात हिंदुत्ववादी नेत्यांवर असे भ्याड हल्ले करणे थांबवा अन्यथा आम्हालाही जशास तसे उत्तर देता येते, हे लक्षात ठेवा असे त्यांनी सांगितले. कोकितकर यांच्यावर वैयक्तिक कारणावरून हा हल्ला झाल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.
यावेळी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments