श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावरील झालेल्या हल्ल्याचा 15 तासांत छडा लावून तिघांना अटक करण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे. आर्थिक व्यवहार, पूर्व वैमनस्य आणि बदला घेण्याच्या हेतूने हा हल्ला करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सांगितले.
बेळगावात आज रविवारी तातडीने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शहर पोलीस आयुक्त बोरलिंगय्या म्हणाले, रवी कोकितकर यांच्यावर कारमधून जात असताना काल शनिवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास हिंडलगा तुरुंगाजवळ गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात कोकितकर व त्यांचा चालक जखमी झाले. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गोळीबार केला होता. याची माहिती मिळताच लगेच आमची टीम अलर्ट होऊन कामाला लागली. मिळालेल्या धागेदोऱ्यांवरून 15 तासांत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अभिजीत भातकांडे, राजू कोडचवाड आणि ज्योतिबा गंगाराम मुतगेकर यांना अटक करण्यात आली आहे.
घटनेची पार्श्वभूमी सांगताना पोलीस आयुक्त बोरलिंगय्या म्हणाले, रवी कोकितकर आणि त्याचा एकेकाळचा मित्र अभिजित भातकांडे पूर्वी रियल इस्टेटचा व्यवहार करत होते. पैशांच्या व्यवहारातून त्यांच्यात वितुष्ट आले आणि दोघे वेगळे झाले. त्यानंतर अभिजित भातकांडे याच्यावर दोन वर्षांपूर्वीची शहापूर येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात रवी कोकितकर प्रमुख आरोपी होता. या प्रकरणी शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद असून कारवाई करण्यात आली होती. त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून अभिजीतने आपल्या सहकाऱ्यांसह कोकितकर यांच्यावर गोळीबार केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. हल्ल्याची माहिती मिळताच आमचे डीसीपी रवींद्र गडादी, डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन राबविण्यात आले. एसीपी एन. व्ही. बरमणी, सदाशिव कट्टीमणी, चंद्रप्पा, गिरीश व सहकाऱ्यांनी युद्धपातळीवर मोहीम राबवून या प्रकरणाची उकल केली. हल्लेखोरांनी देशी पिस्तुलातून गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. प्राथमिक तपासात अभिजिताने गोळीबार केला. गोळीबार प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजच्या विराट हिंदू अधिवेशनाचा आणि हल्ल्याचा काहीच संबंध नाही. पूर्व वैमनस्य, आर्थिक व्यवहार आणि बदल्याच्या भावनेतून हा हल्ला करण्यात आला असून याला दुसरे कोणतेही कारण नाही असे पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला या प्रकरणाचा छडा लावणारे पोलीस अधिकारी डीसीपी रवींद्र गडादी, डीसीपी पी. व्ही. स्नेहा, एसीपी एन. व्ही. बरमणी, सदाशिव कट्टीमणी, चंद्रप्पा, गिरीश आदी उपस्थित होते.


Recent Comments