Khanapur

सशस्त्र राखीव उपनिरीक्षक पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री पदक

Share

खानापुरातील कर्नाटक राज्य पोलीस प्रशिक्षण विद्यालयात गेल्या दोन दशकांपासून सशस्त्र राखीव उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले परसप्पा सदेप्पा पाटील यांना 2016-17 या वर्षासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक प्रदान करण्यात आले. बंगळुरू येथे ५ जानेवारी रोजी झालेल्या समारंभात गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वतीने पाटील यांचे पदक देऊन अभिनंदन केले.
पी. एस. पाटील हे मूळचे बेळगाव तालुक्यातील भूतरामनहट्टी येथील आहेत. ते खानापूर पोलीस प्रशिक्षण शाळेत गेल्या 20 वर्षांपासून ड्रिल इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत आहेत. विभागात नव्याने भरती झालेल्या पोलिसांना त्यांचे मूलभूत प्रशिक्षण घेण्यासाठी उत्कृष्ट मैदानी वातावरण प्रदान केले जाते.

पी. एस. पाटील यांनी प्रशिक्षण देताना विशेष काळजी घेतली आहे. त्यांच्या या सेवेची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना केंद्रीय गृहमंत्री विशिष्ट सेवा पदक देऊन गौरविले. तालुक्याच्या पोलीस विभागाच्या इतिहासात प्रथमच पोलीस खात्यातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री पदकाने पाटील यांना गौरविण्यात आले आहे, हे विशेष. प्राचार्य आमसिद्ध गोंधळी, उपप्राचार्य एस. डी. सत्यनायक, डीएसपी एन. निंगाप्पा यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, भूतरामनहट्टी येथील कुटुंबीय व ग्रामस्थांनी विशेष पदक मिळवून विभागाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या पाटील यांचे अभिनंदन केले.

Tags: