Belagavi

नैराश्यामुळे सिद्धरामय्या यांची घसरतेय जीभ : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

Share

सिद्धरामय्या यांचा तोल गेला आहे. त्यांना स्पर्धा करण्यासाठी मैदान नाही. त्यामुळे त्यांची दिवसेंदिवस निराशा होत आहे. म्हणूनच त्याची जीभ घसरली आहे अशी टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज केली.

बेळगावात आज शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, सिद्दरामय्या मुख्यमंत्री असताना चामुंडी मतदारसंघातून पराभूत झाले. बदामीत ते अवघ्या दीड हजार मतांनी विजयी झाले. याचा अर्थ ते जिथे जातात तिथे हरतात. या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या घाबरले आहेत. कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची हा प्रश्न त्यांना पडला आहे. म्हणूनच आजच निर्णय घ्यावा, असा दबाव शिवकुमार त्यांच्यावर टाकत आहेत. शिवकुमारनाही तेच हवे आहे, ते कुठेही जिंकणार नाहीत हे त्यांना माहित आहे.

शिवकुमार यांनी त्यांना कोपऱ्यात टाकायचे ठरवले आहे. त्यासाठी अर्ज करा असे ते म्हणतात. पण कुठून अर्ज भरू, असा प्रश्न सिद्दरामय्यांना पडलाय. यामुळे हताश झालेल्या सिद्दरामय्यांनी भाजपविरोधात ताकदीने लढणार मीच सर्वात मजबूत नेता आहे हे दाखवण्यासाठी उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार सुरु केलाय. सिद्धरामय्या हे बेताल, बालिश, अडाणी आणि निरुपयोगी विधान करतात. सिद्धरामय्यांबद्दल आपल्या मनात शंका असल्याचे जोशी म्हणाले.

घटनेनुसार निवडणुकीला उभे राहण्यासाठी व्यक्तीचे वय २५ वर्षे असणे आवश्यक आहे आणि तो वेडा नसावा. सिद्धरामय्या यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. इतकी वर्षे राजकारण केल्यानंतर पराभूतांनी तोल सांभाळावा. मी त्यांना त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर राहील अशा पद्धतीने बोलण्याचा सल्ला देतो असे जोशी म्हणाले.

राज्यातील आणि देशातील जनतेने भाजपची विचारधारा, तत्व-सिद्धांत स्वीकारले आहेत. त्यामुळे आम्हाला सर्वत्र प्रतिसाद लाभतोय. या उलट काँग्रेस देशात सर्वत्र अस्तित्वहीन बनत चालली आहे. अनेक राज्यांत ते चौथ्या-पाचव्या स्थानावर फेकले गेलेत. मंगळूर कुकर बॉम्ब स्फोट प्रकरणी सिद्दरामय्यांचे दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ केलेले वक्तव्य हे काँग्रेसी संस्कृतीचे उदाहरण आहे. दिल्लीतील बाटला हाऊस बॉम्ब स्फोट प्रकरणी सोनिया गांधी यांनी देखील असेच वक्तव्य केले होते. दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काँग्रेसचे धोरण असल्याची टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केली.

यावेळी आमदार अनिल बेनके, भाजप राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली, माजी आमदार भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील आदी उपस्थित होते

Tags: