Belagavi

आ . अभय पाटील आयोजित नाश्ते पे चर्चा कार्यक्रम : तक्रारींचे निवारण करण्याचे आमदारांचे ठोस आश्वासन

Share

बेळगाव दक्षिणचे आ . अभय पाटील आयोजित वॉर्ड क्रमांक 30 , 44 आणि 45 या संबंधित वॉर्डातील नागरिकांसाठी नाश्ते पे चर्चा हा कार्यक्रम पार पडला . या कर्यक्रमाला या तिन्ही प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . नागरिकांनी आपल्या तक्रारींचे लेखी निवेदन आमदारांना देऊन , त्या समस्या सोडवण्याचा आग्रह केला . यासाठी आमदार अभय पाटील यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला .

बुधवारी , गॅलॅक्सी हॉल , मंडोळी रोड , टिळकवाडी येथे , आ . अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या नाश्ते पे चर्चा कार्यक्रमात , प्रभाग क्रमांक ३० , ४४ , आणि ४५ चे नगरसेवक , नंदू मिरजकर , आनंद चव्हाण , तसेच माधवी एस राघोचे सहभागी झाले होते . या कार्यक्रमात आ . अभय पाटील या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला . त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघातील झालेली कामे आणि जी कामे करावयाची आहेत त्याबद्दल माहिती दिली . यावेळी , या तिन्ही प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांनी , आपल्या प्रभागातील तसेच वैयक्तिक समस्यांबद्दल आमदारांना लेखी निवेदन दिले . यावेळी आ . अभय पाटील यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन , त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी , अग्रक्रमाने प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले .

कार्यक्रमानंतर , आपली मराठीला या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना , आ . अभय पाटील यांनी सांगितले कि , प्रभाग क्रमांक ३० , ४४ आणि ४५ मधील जनतेच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेऊन त्याचे निरसन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जनतेच्या चांगला प्रतिसाद लाभला आहे . त्यांनी आपले अनेक विषय मांडले आहेत . खासकरून , रस्ता , गटार , लाईट तसेच गार्डन , गॅसकनेक्शन नवीन करून देणे असे अनेक विषय या चर्चिले गेले . यावेळी संबंधित विभागाचे प्रमुख देखील उपस्थित होते . आज जी निवेदने जनतेकडून देण्यात आली आहेत त्याची तीन विभागात विभागणी करून , कामाला सुरुवात करू . आणि ताबडतोब जनतेच्या समस्या आणि तक्रारींचा निपटारा करू असे आ . अभय पाटील यांनी सांगितले .

आ . अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची प्रशंसा करून एका नागरिकाने सांगितले कि आमच्या भागात सुधारणा करण्यात आली आहे मात्र त्याची देखभाल करणे आवश्यक आहे . जनतेचीही ही जबाबदारी आहे . इथे ज्या काही सुधारणा करण्यात येतात त्याची देखभाल करण्यासाठी कर्मचारी नेमावेत , कचऱ्याची रोज उचल करावी , रस्त्याचे लाईट गेले असतील तर तातडीने दुरुस्ती करावी असे सांगून , त्यांनी वॅक्सीन डेपोतील ग्लास हाऊसच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल माहिती दिली तसेच जनतेनेदेखील सार्वजनिक मालमत्तेची काळजी घ्यावी असे आवाहन केले .

तर फुटबॉल कोच विरेश मल्लाबादी यांनी टिळकवाडीतील सुभाषचंद्र बोस मैदानाच्या सुधारणेबाबत आमदारांना निवेदन दिले . याबद्दल आपली मराठीला माहिती देताना त्यांनी सांगितले कि , या मैदानावरील फ्लड लाइट जुने तसेच बाद झाले आहेत . त्याची दुरुस्ती करावी तसेच मैदानावर पाण्यासह पाणी आणि शौचालयाची व्यवस्था त्याचप्रमाणे चेंजिंग रूम नाही . आमदारांना याबद्दल लेखी निवेदन दिले आहे . या सर्व व्यवस्था लवकरात लवकर करून दिल्या तर फार बरे होईल असे ते म्हणाले .

तर आणखी एका नागरिकाने सांगितले कि ,फक्त कार्यक्रम करून उपयोग नाही , तर स्वतः प्रत्यक्ष वॉर्डात येऊन , भेट देऊन वस्तुस्थिती पाहायला हवी . आमच्या इथला रस्ता तात्पुरता सुधारण्यात आला आहे . त्यावरून गाडी चालवणे देखील मुश्किल आहे . त्यामुळे या रस्त्यावर पेव्हर्स बसवून द्यावे किंवा रस्त्याचे काँक्रीटीकरण करून द्यावे . अपघात घडल्यानंतर सुधारणा करण्यापेक्षा आधीच कार्यवाही केलेली कधीही चांगली असे ते म्हणाले .

तर कांचन बेळगावकर या महिलेने , आमदारांनी हा कार्यक्रम आयोजित करून फार बरे केले . आम्हाला प्रत्यक्ष आमदार आणि नगरसेवकांना भेटता आले . आमची वेल्फेअर सोसायटी आहे . आम्ही आमची लेखी तक्रार दिली आहे , त्यावर त्यांनी पर्याय शोधावा आणि आमची सोय करून द्यावी असे सांगितले.

एकंदर आ . अभय पाटील आयोजित या नाश्ते पे चर्चा या कार्यक्रमात आमदारांनी , प्रत्यक्षपणे जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या तक्रारींचे लेखी निवेदन घेऊन त्या सोडवण्याचे ठोस आश्वासन दिले आहे .

Tags: