Belagavi

परीट व्यावसायिकाला मारहाणीचे बेळगावात पडसाद

Share

सोलापूर जिल्ह्यात एका परीट व्यावसायिकाला, त्याच्या 9 महिन्यांच्या गरोदर पत्नीला आणि वृद्ध वडिलांना बेदम मारहाण केल्याच्या घटनेचे बेळगावात आज संतप्त पडसाद उमटले. मराठा रजक परीट आणि मडिवाळ समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून दोषींवर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेळपट नाका गावातील कृष्णा महादेव सोनटक्के या परीट व्यावसायिकाने एका कुटुंबाचे कपडे इस्त्री करून दिल्याचे पैसे विचारले असता, त्या कुटुंबातील चौघांनी लोखंडी सळ्या, काठ्यांनी बेदम मारहाण केली. यात कृष्णा यांचा पाय मोडला असून, हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे कृष्णा यांच्या 9 महिन्यांच्या गरोदर पत्नीला आणि वृद्ध वडिलांनाही बेदम मारहाण केली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी बेळगावात आज मराठा रजक परीट आणि मडिवाळ समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत निदर्शने करून दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले.

या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना खानापूर तालुका मराठा रजक समाजाचे सचिव संतोष परीट यांनी हा घटनाक्रम सांगून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

बेळगाव जिल्हा मराठा रजक समाजाचे अध्यक्ष विठ्ठल भरमा पाळेकर यांनी सांगितले की, कृष्णा महादेव सोनटक्के यांनी कपडे इस्त्री करून दिल्याचे मेहनतीचे पैसे मागूनही त्यांना त्या कुटुंबातील चौघांनी बेदम मारहाण केल्याने त्यांचा पाय जायबंदी जपून त्यांची अपंगासारखी अवस्था झाली आहे. हल्लेखोरांनी निर्दयीपणे कृष्णा यांच्या 9 महिन्यांच्या गरोदर पत्नीला आणि वृद्ध वडिलांनाही बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्यांना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करतो. आमच्या भावना बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवून कारवाईची सूचना करण्याच्या मागणीचे निवेदन आम्ही देत आहोत असे सांगितले.

यावेळी मराठा रजक समाजाचे अध्यक्ष विठ्ठल भरमा पाळेकर, उपाध्यक्ष मयूर यशवंत चव्हाण, गाडगेबाबा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विनायक पवार, खानापूर तालुका मराठा रजक समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण बसवंत पाळेकर, लौंड्री असोसिएशनचे अध्यक्ष पुंडलिक परीट यांच्यासह रजक समाजाचे स्त्री-पुरुष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: