पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या लोक कल्याणकारी कार्यक्रमांमुळे आगामी निवडणुकीत कर्नाटकात विरोधकांना धूळ चारून भाजप पुन्हा सत्तेत येईल असा दावा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केला.
मंड्या येथे आयोजित भाजपच्या जनसंकल्प यात्रेचे उदघाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, भाजपचे सरचिटणीस सी.टी. रवी, मंत्री के.गोपलय्या, आ. नारायण गौडा आदी उपस्थित होते.

अमित शाह पुढे म्हणाले, केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. त्यामुळे जनसामान्यांचे जगणे सुकर झाले आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकात बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनेही अनेक कल्याणकारी कार्यक्रम राबवून जनहिताला प्राधान्य दिले आहे. भाजप संपूर्ण जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला आहे. लोकमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताने पुन्हा सत्तेत येईल असा दावा त्यांनी केला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, आज पर्यायी इंधनाची गरज भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोलॅसिस उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने प्रति टन शंभर रुपये अधिक दर देण्याचा निर्णय घेऊन आदेश बजावला आहे असे सांगितले. मंड्या येथील माय शुगर कारखाना अनेक वर्षांपासून बंद पडला होता. कोणत्याही सरकारने तो सुरु करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. तो खासगी कंपनीला देण्यासाठी दबाव आणण्यात येत होता. मात्र येथील लोकप्रतिनिधी आणि शेतकरी नेत्यांनी सरकारी मदतीतूनच तो सुरु करण्याची मागणी केली. त्यानुसार आम्ही तो पुन्हा सुरु करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केले आहे. पुढील वर्षांपासून येथे इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात येईल. संपूर्ण कर्नाटकाचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प आहे. बेंगळूर-म्हैसूर सुपरफास्ट महामार्ग पंतप्रधान मोदींच्या मुळे झाला. पुढील महिन्यात त्याचे मोदींच्या हस्ते उदघाटन होणार आहे. डबल इंजिन सरकारमुळे विकासाचे नवे पर्व राज्यात सुरु झाले आहे. येत्या निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले.
यावेळी मंड्या तसेच परिसरातील जिल्ह्यातील हजारो भाजप कार्यकर्ते जनसंकल्प यात्रेला उपस्थित होते.


Recent Comments