कर्नाटक विधिमंडळाचे सुवर्णसौधमध्ये पार पडलेल्या 9 दिवसांच्या अधिवेशनात एकूण 41 तास 20 मिनिटे कामकाज चालले असून हे अधिवेशन यशस्वी झाल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी बेळगावात दिली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आज शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सभाध्यक्ष कागेरी म्हणाले, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध मान्यवरांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडून मंजूर करण्यात आले. राज्यपालांची मंजुरी घेतलेल्या विधेयकांवर सचिवांकडून प्राप्त अहवाल मांडण्यात आले. देशाच्या महालेखापरीक्षकांडून महानगर पालिकांत मुख्यमंत्री नगरोत्थान योजना (तिसरा टप्पा) वरील लेख परीक्षण अहवाल आणि 2021-22च्या धन विनिमय लेख परीक्षण सभागृहात मांडण्यात आले. 2021-22च्या विधिमंडळाच्या विविध संयुक्त समित्या आणि विधानसभेच्या समित्यांची पुनर्र्चना करण्याचे अधिकार सभागृहाने सभाध्यक्षांना दिले. विधानसभेत ह्कभंगाचा एक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर चर्चा करून तो फेटाळण्यात आला. आतापर्यन्त सभागृहात उत्तम आमदार पुरस्कार केवळ बेंगळूर विधानसौधमध्येच देण्यात येत. परंतु आम्ही यंदा प्रथमच बेळगाव सुवर्णसौधमध्ये हा कार्यक्रम घेतला. यावेळी ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे यांना तो प्रदान करण्यात आला असे कागेरी यांनी सांगितलं .
बेळगाव सीमाप्रश्नावरून सीमाभागात आणि दोन्ही राज्यात महाराष्ट्रातील नेत्यांमुळे होणाऱ्या तणावाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सभागृहात ठराव करण्याची मागणी आली. ती मान्य करण्यात आली. त्यानंतर सभागृहाने सीमाप्रश्नावर कर्नाटकाची भूमिका मांडणारा ठराव सर्वानुमते मंजूर करून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला आमची भूमिका कळवली आहे असे ते म्हणाले.

एकंदर अधिवेशनाच्या कामकाजात 97% प्रगती झाली आहे. मी आमदारांना अधिवेशनात उपस्थित राहण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. त्यामुळे एकूण उपस्थिती 74% राहिली, जी अपेक्षेहून अधिक आहे. शून्य प्रहरात 40 विषयांवर चर्चा झाली. विधानसभेत एकूण 41 तास 20 मिनिटे कामकाज चालले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात महापुरुषांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यानी दिलेल्या शब्दाप्रमाणे विधानसभेच्या समोर राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे पुतळे उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आले. एकंदर बेळगाव अधिवेश यशस्वी झाल्याचे विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी सांगितले.
यावेळी विधानसभा सचिव विशालाक्षी, जिल्हाधिकारी नितीश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments