हिरेबागेवाडीजवळ राणी चन्नम्मा विद्यापीठासाठी जमीन घेतो म्हणून सांगून नंतर न घेणे आणि त्यापूर्वी मंजूर झालेली पाणी योजना रद्द करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्यावरून बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज सरकारला धारेवर धरले. त्यावर शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे उच्च शिक्षणमंत्री अश्वत्थ नारायण यांनी सांगितले.
विधानसभेत आज गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात आ. लक्ष्मी हेब्बाळकर या प्रश्नावरून चांगल्याच आक्रमक झाल्याचे दिसून आले. हिरेबागेवाडी परिसरात चन्नम्मा विद्यापीठासाठी जागा निश्चित करण्यापूर्वी मंत्रिमंडळात त्या परिसरातील शेतकरी, त्यांच्या जनावरांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 130 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले होते. मात्र विद्यापीठ कॅम्पस उभारण्याचे ठरल्यावर ही योजनाच रद्द करण्यात आली. शिवाय विद्यापीठाचे काम सुरु झाल्यावर मोठे कंपाउंड बांधून शेतकऱ्यांचे शेतीकडे जाणारे रस्तेही बंद करण्यात आल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. फ्लो
विद्यापीठाला शेतकऱ्यांनी जागा द्यावी म्हणून कुलगुरूंनी प्रति एकर 40 लाख रुपये दर देण्याचे आमिष पत्र लिहून दाखवले. प्रत्यक्षात भू संपादन झालेच नाही. उलट विद्यापीठाच्या जागेवर मोठे कंपाउंड बांधून शेतकऱ्यांचे पारंपरिक शेतरस्ते बंद करण्यात आले. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे, यात राजकारण केले जात आहे असा आरोप आ. हेब्बाळकर यांनी केला. त्यानंतर मंत्री अश्वत्थ नारायण आणि त्यांच्यात वाद झाला फ्लो त्यानंतर बोलताना मंत्री अश्वत्थ नारायण म्हणाले, 2010मध्ये भूतरामनहट्टी येथे चन्नम्मा विद्यापीठाची वनखात्याच्या सुरवात झाली. वनखात्याने जागा सोडण्यास नकार दिल्याने जागेचा प्रश्न निर्माण झाला. आम्ही सत्तेवर येताच हिरेबागेवाडीजवळ 126 एकर 20 गुंठे जागेत विद्यापीठाचा स्वतंत्र कॅम्पस उभारण्याचा निर्णय घेतला. एवढी जागा पुरेशी असल्याने अतिरिक्त जमीन संपादन न करण्याचा निर्णय झाला.
या जागेला जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः भेट देऊन पाहणी करून अहवाल दिला आहे. रेव्हेन्यू मॅपमध्ये रस्ते नव्हते. ते निश्चित करून कंपाउंड पाडून रस्ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात सदस्यांना राजकारण दिसते, कारण ते तेच करतात असा चिमटा त्यांनी काढला. त्यामुळे लक्ष्मी हेब्बाळकर पुन्हा आक्रमक होऊन उभयतात वाद झाला. त्यावर सभापती विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी मध्यस्थी करत, एकरी 40 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून नंतर निर्णय रद्द केला, कुलगुरूंचे पत्र रद्द झालेय का? रद्द करून शेतकऱ्यांना कळवा, गैरसमज झालाय, तो दूर करा, पुढे काय करणार ते सांगा अशी सूचना मंत्री अश्वत्थ नारायण याना केली.
त्यावर बोलताना मंत्री अश्वत्थ नारायण यांनी, जमीन गेली नाही म्हणून उलट शेतकऱ्यांनी खुश व्हायला पाहिजे, रेव्हेन्यू मॅपमध्ये रस्ते नव्हते. ते निश्चित करून कंपाउंड पाडून रस्ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत असे सांगितले.
मात्र या उत्तरावर लक्ष्मी हेब्बाळकर यांचे समाधान झाले नाही. मी शिक्षणाला मतदारसंघात किती महत्व देते हे सगळ्या जिल्ह्याला माहित आहे. विद्यापीठाला माझा विरोध नाही. पण जनतेचे कररुपी सरकारी पैसे मंजूर करून पाणीयोजना रद्द करणे चुकीचे आहे. ही योजना झाली असती तर स्थानिक शेतकऱ्यांचे चांगले झाले असते. मंत्रिमंडळाचा निर्णय सरकारने का फिरवला याचे उत्तर मंत्र्यांनी द्यावे अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मंत्री अश्वत्थ नारायण यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.


Recent Comments